मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 05:36 PM2017-12-07T17:36:22+5:302017-12-07T17:46:56+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीच म्हणून केलेल्या उल्लेखावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ते बोललेत की, 'भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे. काँग्रेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेल्या भाषेचं समर्थन होऊ शकत नाही. मी आणि काँग्रेस पक्ष त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा करतो'.
BJP and PM routinely use filthy language to attack the Congress party. The Congress has a different culture and heritage. I do not appreciate the tone and language used by Mr Mani Shankar Aiyer to address the PM. Both the Congress and I expect him to apologise for what he said.
— Office of RG (@OfficeOfRG) December 7, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला होता. काँग्रेसच्या एका कुटुंबाला वाढवण्यासाठी बाबसाहेब आंबेडकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी मोदींना नीच आणि असभ्य म्हणून टाकलं. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.
पंतप्रधानांच्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर इतके संतापले की त्यांनी मोदींना खरं खोटं सुनावलं आहे. ते बोलले की, 'आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, ते पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने सर्वात मोठं योगदान दिलं ते म्हणजे जवाहरलाल नेहरु. अशा कुटुंबाबद्दल तुम्ही इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलता आणि तेदेखील आंबेडकरांच्या आठवणीत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्धाटनावेळी. मला वाटतं हा माणूस एकदम नीच आहे. त्याच्यात कोणती सभ्यता नाही. अशावेळी इतक्या घाणेरड्या राजकारणाची काय गरज'.
मणिशंकर अय्यर यांच्या टिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलं आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं. सूरतमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'उच्च आणि नीच या गोष्टी त्यांच्या संस्कारातच नाहीत. या सर्व गोष्टी त्यांनाच लख लाभो'.
गुजरातची जनता भाजपाला मतं देऊन आपलं उत्तर देईल असा दावा मोदींनी केला आहे. काँग्रेसने गुजरातच्या मुलासाठी 'नीच' शब्दाचा वापर केला असल्याचं मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या त्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांना 'मौत का सौदागर' संबोधण्यात आलं होतं. मोदींनी मणिशंकर अय्यर यांच्या टीकेला उत्तर न देण्याचं आवाहन भाजपा नेत्यांना केलं आहे.
'काँग्रेस नेते वापरत असलेली भाषा लोकशाहीला अनुसरुन नाही. काँग्रेसचा एक नेता जो प्रतिष्ठित संस्थेत शिकला, केंद्रीय मंत्री राहिला तो म्हणतो मोदी नीच आहेत. हे अपमानजनक आहे. ही मोघलाई विचारसरणी आहे', अशी टीका मोदींनी केली. अशाप्रकारची भाषा वापरणा-यांनी गुजरातची जनता चांगलं उत्तर देईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. 'तुम्ही मला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून पाहिलं आहे. माझ्यामुळे कोणाला आपली मान खाली घालायला लागली का ? मी कोणतीही लाजिरवाणी गोष्ट केली का ? मग ते मला नीच का म्हणत आहेत', असे सवाल मोदींनी विचारले.