मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:37 AM2023-12-28T05:37:58+5:302023-12-28T05:38:28+5:30

१४ राज्ये व ८५ जिल्ह्यांमधून प्रवास

manipur to mumbai 6200 km rahul gandhi bharat nyay yatra starting from 14th january | मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील वर्षी दक्षिणेतून उत्तरेपर्यंत पार पडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १४ जानेवारी ते २० मार्चदरम्यान ‘भारत न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. याची घोषणा कॉंग्रेसने बुधवारी केली. मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाणारी ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून ६२०० किलोमीटर अंतर कापणार आहे.

राहुल गांधी यांनी ७ डिसेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा पूर्ण केली होती. १३६ दिवसांच्या यात्रेत राहुल यांनी १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील ७५ जिल्ह्यांतून ४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. त्यानंतर आता  ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून मुंबईत संपणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना दिली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे १४ जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.

फायदा काय?

भारत जाेडाेचा फायदा कर्नाटक, तेलंगणामध्ये झाला हाेता. आता न्याय यात्रेचा फायदा लाेकसभा निवडणुकीत हाेण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या दृष्टीने ही राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत.

सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायासाठी...

जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये आर्थिक विषमता, ध्रुवीकरण आणि हुकूमशाहीचे मुद्दे उपस्थित केले होते, तर ‘न्याय यात्रा’ देशातील लोकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर लक्ष केंद्रित करील. भारत न्याय यात्रेत एकता, प्रेम आणि समरसतेचा संदेश दिल्यानंतर गांधी आता देशातील जनतेला न्याय मिळवून देणार आहोत.

बस व पदयात्रा...

पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले, की या यात्रेदरम्यान देशातील महिला, तरुण आणि वंचित समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. ‘भारत न्याय यात्रा’ बहुतांश बसने निघेल; पण काही ठिकाणी पायी यात्राही निघेल.

सुरुवात मणिपूरमधून का? 

हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोकांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जखमा भरून काढण्यासाठी मणिपूरमधून यात्रा सुरू करत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.

रुपरेषा तयार हाेतेय...

‘इंडिया’विरोधी आघाडीचे इतर गट या यात्रेत सहभागी होतील का, असे विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जात आहे. रमेश म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’मध्ये विविध राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.


 

Web Title: manipur to mumbai 6200 km rahul gandhi bharat nyay yatra starting from 14th january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.