...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 17, 2020 11:57 AM2020-11-17T11:57:19+5:302020-11-17T12:04:47+5:30
ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेससंदर्भात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. याच पुस्तकात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना नर्व्हस विद्यार्थी म्हटले आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जबरदस्त प्रशंसा केली आहे. एवढेच नाही, तर सोनिया गांधी यांच्यामुळेच मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते, असेही त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.
ओबामा यांनी 'अ प्रॉमिस्ड लँड' या त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, की 'सोनिया गांधी यांनी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची केलेली निवड योग्य होती, असे अनेक राजकीय अभ्यासकांचे म्हणणे होते. कारण, मनमोहन सिंग हे वृद्ध होते, तसेच त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय राजकीय आधार नव्हता. त्यामुळे त्यांच्यापासून सोनिया गांधी यांचा 40 वर्षीय मुलगा राहुल यांना कसल्याही प्रकारचा धोका नव्हता. सोनिया गांधी या राहुल गांधींना काँग्रेस पक्ष सांभाळण्यासाठी तयार करत होत्या.'
ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे, की ते जेव्हा मनमोहन सिंग यांच्या घरी डिनर पार्टीसाठी गेले, तेव्हा तेथे सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित होते. सोनिया गांधींसंदर्भात लिहिताना ओबामा यांनी म्हटले आहे, त्यावेळी त्यानी कमी बोलून अधिक ऐकनेच पसंत केले. मात्र, जेव्हा धोरणात्मक विषयांवर बोलायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी सावधपणे मनमोहन सिंग यांना वेगळे ठेवले आणि आल्या मुलासंदर्भातील (राहुल गांधी) चर्चा पुढे सुरू ठेवली.'
राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती -
बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे. याच बरोबर, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत, ते एक अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींबद्दलही बराक ओबामा यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपल्याला चार्ली क्रिस्ट आणि रहम अमॅनुएल यांसारख्या हॅण्डसम पुरुषांबद्दलच सांगण्यात आले आहे. पण, महिलांच्या सुंदरतेबद्दल सांगितले नाही. केवळ एक किंवा दोन उदारणच अपवाद आहेत, जसे की, सोनिया गांधी. तसेच, अमेरिकेचे माजी संररक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग या दोन्ही नेत्यांमध्ये प्रामाणिकता असल्याचं ओबामा यांनी लिहिलं आहे.
बराक ओबामा हे २०१७ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. बराक ओबामा यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाली. त्यांना पुन्हा एकदा भेटणे हा चांगला अनुभव होता. बराक ओबामा यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ड्रिम्स फ्रॉम माय फादर, द ऑडेसिटी ऑफ होप आणि चेंज वी कॅन बिलिव्ह इन यांचा समावेश आहे.