राहुल गांधींच्या सभागृहातील अनुपस्थितीने अनेक जण संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:50 AM2019-11-25T05:50:44+5:302019-11-25T05:51:14+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (१८ नोव्हेंबर) सभागृहात सतत गैरहजर असल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. गांधी बहुधा उद्याही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (१८ नोव्हेंबर) सभागृहात सतत गैरहजर असल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. गांधी बहुधा उद्याही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही.
सूत्रांनी दिलेली माहिती विश्वासार्ह मानल्यास गांधी शुक्रवारी रात्री अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत. ते परत कधी येतील याची काहीही कल्पना नाही. गेला संपूर्ण आठवडा राहुल गांधी हे पक्षाच्या नेत्यांना न भेटता त्यांच्या १२ तुघलक लेनवरील निवासस्थानी होते. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या कोणत्याही बैठकीत राहुल गांधी सहभागी नव्हते. मात्र काही प्रसार माध्यमांत राहुल गांधी हे महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाण्याच्याविरोधात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, राहुल गांधी यांचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि राजकीय गुरू ए. के. अँटोनी यांनी पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या मैत्रीला हिरवा कंदील दाखवला होता.
पक्षाच्या नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले की, राहुल गांधी हे मोबाईलवर फोन केल्यास तसेच एसएमएस केल्यावर त्यालाही उत्तर देत नाहीत. राजकीय घडामोडींपासून राहुल गांधी हे पूर्णपणे वेगळे झाल्यामुळे सोनिया गांधी यांना एकटीला कठीण संघर्ष असलेली लढाई लढावी लागत आहे. राहुल गांधी हे पक्षात जे घडावे वाटते ते घडत नसल्यामुळे तसेच नेते त्यांचे अनुसरण करीत नसल्यामुळे खूपच हताश झाले असून निराशही आहेत, असे सूत्रांनी सांगितले. बहुधा याच कारणांमुळे राहुल गांधी हे कंबोडियाहून परतल्यावर ब्राझीलला खासगी दौऱ्यावर गेले होते. ते १५ नोव्हेंबर रोजी दिल्लीला परतले आणि २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा देशाबाहेर गेले. १९ नोव्हेंबर रोजी त्यांची आजी इंदिरा गांधी यांची जयंती होती तरीही राहुल गांधी शक्तीस्थळावर त्यांना आदरांजली वाहण्यास गेले नाहीत.