मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 06:34 AM2024-08-08T06:34:07+5:302024-08-08T06:34:53+5:30
विधानसभेच्या १५५ जागा सोडून इतर जागांसाठी आता उद्धवसेना, शरद पवार गट, काँग्रेस या तिघांना बोलणी करावी लागेल.
आदेश रावल -
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली. विधानसभेच्या १५५ जागा सोडून इतर जागांसाठी आता उद्धवसेना, शरद पवार गट, काँग्रेस या तिघांना बोलणी करावी लागेल.
तीनही पक्षांत विधानसभा जागांबाबत बोलणी होतील त्यावेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे का हे तपासले जाणार आहे. मविआतील तीनही पक्षांच्या वेगवेगळ्या नव्हे तर एकच वॉररूम तयार करावी असाही विचार सुरू आहे. त्याचा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात त्या पक्षांना मोठा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रातील जनतेसमोर हे पक्ष एकच अजेंडा घेऊन जाणार आहेत. उद्धवसेना गट, शरद पवार गट, काँग्रेस यांच्यात उत्तम एकजूट आहे हे जनतेला दर्शविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते प्रचारसभांमध्ये एका व्यासपीठावर दिसायला हवेत अशा मुद्द्यांवरही चर्चा झाली.
‘सहनशीलतेचा अंत पाहू नका’
लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा संदेश बांगलादेशमधील घटनांतून साऱ्या जगाला मिळाला आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असून, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वाचविले पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘मी मुख्यमंत्रिपदी असावे का, हे इतर पक्षांना विचारा’
मी उत्तम काम केले आहे असे मविआतील पक्षांना वाटत असल्यास मी मुख्यमंत्रिपदी असावे अशी त्यांची भावना आहे का हे तुम्ही त्यांनाच विचारा, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, मला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत नाही किंवा ते पद मिळावे अशी इच्छाही नाही. मात्र मी जबाबदारी स्वीकारण्यापासून पळ काढत नाही. जेव्हा त्या पदाची जबाबदारी आली तेव्हा ती स्वीकारून उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला.