ईडीच्या भीतीने मायावतींनी आघाडी केली नाही, राहुल गांधी यांचा निवडणुकीबाबत गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 06:38 AM2022-04-10T06:38:05+5:302022-04-10T06:40:21+5:30
Rahul Gandhi News: केवळ ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीमुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.
नवी दिल्ली : केवळ ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीमुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.
काँग्रेस नेते के. राजू यांच्या दलित ट्रूथ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी राहुल गांधी बोलत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी काँग्रेसतर्फे मायावती यांना आघाडीसाठी प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ईडी व सीबीआयच्या कारवायांच्या भीतीमुळे मायावतींनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. मी एक पैशाचा गैरव्यवहार केला असता तर मी आज तुमच्यापुढे भाषण करताना दिसलो नसतो.
बाबासाहेबांचेयोगदान मोठे
देशात राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. परंतु देशातील संस्था खिळखिळ्या झाल्या तर या राज्यघटनेला काहीही अर्थ उरणार नाही. देशातील संस्था प्रबळ राहिल्या नाही तर लोकशाहीतील बहुमताला काही महत्त्व राहणार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.