कमलनाथ सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करणार, मायावतींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:49 AM2019-05-01T02:49:11+5:302019-05-01T06:13:30+5:30
गुणा येथील बसप उमेदवार लोकेंद्रसिंह राजपूत यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच येथील काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबाही जाहीर केला. त्यामुळे बसपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.
भोपाळ : गुणा लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत. मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करण्याचा इशारा बसपच्या प्रमुख मायावती यांनी दिला आहे.
गुणा येथील बसप उमेदवार लोकेंद्रसिंह राजपूत यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच येथील काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबाही जाहीर केला. त्यामुळे बसपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. मायावती याबाबत ट्विटमध्ये म्हटले आहे की, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्यात काँग्रेस भाजपपेक्षा कुठेही कमी नाही. लोकेंद्रसिंह राजपूत यांनी बसपमधून बाहेर पडावे, म्हणून काँग्रेसने हरतऱ्हेचे प्रयत्न केले.
मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत २३० सदस्यांच्या सभागृहामध्ये काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला होता. मात्र सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला आणखी दोन आमदारांचा पाठिंबा हवा होता. त्यावेळी बसपा, सपा या पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराने समर्थन दिल्यानंतर कमलनाथ सरकार अस्तित्वात आले. या निवडणुकीत भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. या साऱ्या वास्तवाची जाणीव करून देत मायावतींनी काँग्रेसला खणखणीत इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसला ठेवले दूर
लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात सपा व बसपने आघाडी करताना काँग्रेसला दूर ठेवले होते. त्याचा राग त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मनातही आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसने स्वबळावर लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. या राज्याच्या पूर्व भागाची जबाबदारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली. २०२२ साली उत्तर प्रदेशात होणाºया विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला विजयी करणे हे लक्ष्य त्यांनी डोळ्यापुढे बाळगले आहे. त्यामुळे सप व बसपलाही मोठा राजकीय धक्का बसू शकतो. भविष्यातल्या या साऱ्या घडामोडी लक्षात घेऊन मायावतींनी आतापासूनच काँग्रेसबाबत आक्रमक व सावध भूमिका घेतली आहे.