सोनिया, राहुल, प्रियांका गांधींच्या राजीनाम्याची चर्चा; पण काँग्रेसकडून इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 09:25 PM2022-03-12T21:25:31+5:302022-03-12T21:49:40+5:30

काँग्रेस कार्यकारिणीची उद्या बैठक; निवडणुकांतील पराभवानंतर नाराज नेते आक्रमक

Mischievous Congress Denies Rahul Sonia Priyanka gandhi to Offer Resignation Tomorrow | सोनिया, राहुल, प्रियांका गांधींच्या राजीनाम्याची चर्चा; पण काँग्रेसकडून इन्कार

सोनिया, राहुल, प्रियांका गांधींच्या राजीनाम्याची चर्चा; पण काँग्रेसकडून इन्कार

Next

- शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाल्यानंतर आज, रविवारी होत असलेल्या पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत विद्यमान नेतृत्वावर घणाघाती टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीच्या प्रारंभीच गांधी परिवारातील राहुल, सोनिया व प्रियांका गांधी यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. 

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये तातडीने संघटनात्मक निवडणुका घेण्याचा आग्रह विद्यमान पक्षाध्यक्ष सोनिया गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत धरणार आहेत. या निवडणुकांमुळे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष व नवी कार्यकारिणी अशा दोन्ही गोष्टी मिळतील. काँग्रेस कार्यकारिणीच्या आज होणाऱ्या बैठकीत कोणते मुद्दे उपस्थित करायचे याची रणनीती त्या पक्षातील २३ नाराज नेत्यांनी ठरविली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची एक बैठकही झाली. राहुल गांधी यांच्यावर हे नेते घणाघाती टीका करणार आहेत.

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, अशोक गेहलोत किंवा सचिन पायलट यापैकी एका नेत्याची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करावी असा पक्षात मतप्रवाह आहे. अशोक गेहलोत अध्यक्ष झाल्यास सचिन पायलट यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही नेते करणार आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी सक्षम नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी सुनील जाखड यांच्या नावाला अनेक काँग्रेस नेत्यांचा होकार असल्याचे समजते. उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावा, अशी मागणी आनंद शर्मा यांच्यासहित काही नाराज नेते पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसने मात्र सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. राजीनाम्याच्या वृत्ताला कोणताही आधार नाही. ते पूर्णपूर्ण चुकीचे असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसश्रेष्ठींशी तर पृथ्वीराज चव्हाणांची बंडखोर नेत्यांशी चर्चा
महाराष्ट्राचे महसूल मंत्री व काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दिल्लीत दाखल झाले. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असंतुष्ट गटाचे सदस्य म्हणून बंडखोर नेत्यांशी चर्चा केली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर होणार नसल्याचे थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. परंतु, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीराहुल गांधी यांची शनिवारी भेट होऊ शकली नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करणार
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची निवड पुढील आठवड्यात होणार आहे. या पदासाठी उत्सुक असलेल्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता नसून, ते पक्षातील नाराज नेत्यांशी चर्चा करीत आहेत. काँग्रेसमधील असंतुष्टातील गटाला महाराष्ट्रातून चव्हाण यांच्याकडून पाठबळ मिळणार आहे.

Web Title: Mischievous Congress Denies Rahul Sonia Priyanka gandhi to Offer Resignation Tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.