टोमॅटो-मिरचीचा हार घालून विधानसभेत आल्या महिला आमदार; म्हणाल्या, "हे मुख्यमंत्र्यांसाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:01 PM2023-07-11T17:01:22+5:302023-07-11T17:02:33+5:30
टोमॅटोचे वाढलेले भाव आणि महागाईबाबत काँग्रेस आमदार कल्पना वर्मा यांनी विधानसभेत निदर्शनं केली.
टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत देशभरात निदर्शने होत असताना मध्य प्रदेशातील आमदाराने अनोख्या पद्धतीने निदर्शन केलं आहे. टोमॅटोचे वाढलेले भाव आणि महागाईबाबतकाँग्रेस आमदार कल्पना वर्मा यांनी विधानसभेत निदर्शनं केली. गळ्यात मिरची आणि टोमॅटोचा हार घालून त्या विधानसभेत आल्या. विधानसभेबाहेर पोहोचताच प्रसारमाध्यमांनी घेरलं आणि विधानसभेत असंच जाणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांचं उत्तर होकारार्थी असून हा हार मुख्यमंत्र्यांसाठी असल्याचंही सांगितलं.
आमदार कल्पना वर्मा म्हणाल्या की, "आज एवढी महागाई झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री लाडली बहन योजनेत एक हजार रुपये देत आहेत. त्यामध्ये गरिबांची एक दिवसाची भाजीही येत नाही. त्या लाडली बहन योजनेला माझा विरोध आहे. मी देखील एक गृहिणी आहे आणि मला महिलांच्या स्वयंपाकघराची परिस्थिती, त्या त्यांचं घर कसं चालवतात हे चांगलंच माहीत आहे."
मीडियाने आमदार कल्पना यांना पुढे विचारले की, तुम्ही आणलेल्या टोमॅटो आणि मिरचीचा हार कोणाला घालणार आहेत, तेव्हा कल्पना वर्मा यांनी उत्तर दिले की, "माझा सरकारच्या मुद्द्याला आणि लाडली बहन योजनेला विरोध आहे आणि त्याअंतर्गत मी हा हार घातला आहे. हा हार मुख्यमंत्र्यांसाठी आहे आणि त्यांना घालायचा असेल तर तो मी घालेन."
आमदार कल्पना म्हणाल्या की, महागाईमुळे सर्वत्र महिला त्रस्त झाल्या आहेत. सरकारच्या योजनेला माझा विरोध आहे. टोमॅटो आणि भाज्यांच्या वाढत्या दरामुळे जनता हैराण झाली आहे. अशा योजनांचा उपयोग नाही. त्यांचा हा टोमॅटो-मिरचीचा हार घातलेला फोटो जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.