सत्तेत येण्यासाठी मोदींनी खोटी कणखर प्रतिमा उभी केली; राहुल गांधी यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:37 PM2020-07-20T22:37:24+5:302020-07-21T06:35:46+5:30
राहुल गांधींनी म्हटले की, चीनची सध्या जी पावले पडत आहेत त्याचा संबंध केवळ सीमावादाशी नाही.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यासाठी एक ‘कणखर नेता’ अशी स्वत:ची खोटी प्रतिमा जनमानसात उभी केली. तेच त्यांचे सर्वात मठे बलस्थान होते. मोदींची ती खोटी प्रतिमा हेच आज भारताचा सर्वात मोठा दुबळेपणा ठरत आहे, अशी घणाघाती व व्यक्तिगत टिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली. राहुल गांधी यांचे ट्विट व त्यासोबतचे निवेदन याचा संपूर्ण संदर्भ पूर्व लडाख सीमेवर चीनने अलिकडेच केलेली घुसखोरी आणि प्राणघातक हाणामारी व त्या परिस्थितीची मोदी सरकारने केलेली हाताळणी हा होता.
राहुल गांधींनी म्हटले की, चीनची सध्या जी पावले पडत आहेत त्याचा संबंध केवळ सीमावादाशी नाही. त्यामागे त्यांची खूप विचारपूर्वक तयार केलेली धूर्त योजना आहे. भारताच्या पंतप्रधांनांवर चहुबाजूमनी दबाव आणायचा व त्यांच्या प्रतिमेवर आघात करायचा ही पद्दतशीर खेळी चीन खेळत आहे.
नरेंद्र मोदींना प्रभावी राजकीय नेता म्हणून टिकून राहायचे असेल तर स्वत:ची छप्पन इंची (छाती) प्रतिमा जपण्याखेरीज पर्याय नाही, हे चीनने पक्के ओळखले आहे म्हणूनच चीन मोदींच्या ‘कणखर’ प्रतिमेवर आघात करत आहे. थोडक्यात, तुम्ही आमच्या इशाऱ्यानुसार वागला नाहीत तर तुमची कणखर नेत्याची प्रतिमा आम्ही पार धुळीला मिळवू, असे चीन मोदींना सांगत आहे.
मोदींना स्वत:ची प्रतिमा प्राणप्रिय आहे व त्यावरून आपण त्यांना कसेही झुकवू शकतो, असा चीनचा समज होऊ दिला, तर अशा पंतप्रधानाची भारतासाठी कवडीचीही किंमत राहणार नाही.
-राहुल गांधी, काँग्रेस नेते
च्टिकेची हिच धार कायम ठेवत व्हिडिओत राहुल गांधी पुढे म्हणतात की, आता मोदी कसे प्रत्युत्तर देतात हा खरा प्रश्न आहे. ‘मी भारताचा पंतप्रधान आहे व मला माझ्या प्रतिमेची जराही तमा नाही’, असे चीनला ठणकावून सांगून मोदी हे आव्हान स्वीकारतील की चीनपुढे नांगी टाकतील?