No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:53 AM2018-07-20T05:53:04+5:302018-07-20T05:54:58+5:30

लोकसभेत आज मोदी सरकारची परीक्षा

modi government will face No Confidence Motion today | No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव

No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने उरलेले विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील, पण ठराव संमत होण्याची शक्यता अजिबातच नाही. आपला ठराव संमत होणार नाही, हे विरोधकांनाही माहीत आहे आणि ते तसे मान्यही करीत आहेत. पण यानिमित्ताने सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. त्यामुळे सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे.

या ठरावावरील चर्चेच्या वेळी आपल्या सदस्यांनी उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस, भाजपा, तेलगू देसम, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद यांसह जवळपास सर्वांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला आहे. शिवसेनेने मात्र ‘व्हिप’ सायंकाळी उशिरा मागे घेतला. आता ठाकरे शुक्रवारी भूमिका स्पष्ट करतील. शिवसेना कदाचित हजर राहून मतदान न करण्याचा किंवा मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णयही घेईल. बिजू जनता दलाने निलंबित केलेले जय पांडा यांनी जून महिन्यात खासदारकीचा दिलेला राजीनामा लोकसभाध्यक्षांनी आज मंजूर केला.

कोण बाजूने, कोण विरोधात?
ठरावाला शिवसेना व अण्णा द्रमुक हे पक्ष पाठिंबा देणार नाहीत, तर तेलंगणा राष्ट्र समितीही या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. बिजू जनता दलाने आपली भूमिका उद्या जाहीर करण्याचे ठरविले आहे. हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, असे सांगण्यात येते आहे.

चर्चेला कोणाला किती वेळ?
भाजपा : ३.३३ तास
काँग्रेस : ३८ मिनिटे
अद्रमुक : २९ मिनिटे
तृणमूल : २७ मिनिटे
बीजेडी : १५ मिनिटे
शिवसेना : १४ मिनिटे
तेलगू देसम : १३ मिनिटे
टीआरएस : ९ मिनिटे
माकप : ७ मिनिटे
सपा : ६ मिनिटे
राष्ट्रवादी : ६ मिनिटे
लोजपा : ५ मिनिटे

Web Title: modi government will face No Confidence Motion today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.