मोदी, नितीशकुमारांना सत्तेतून घालवूच; महाआघाडीची पाटण्यात महारॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:46 AM2019-02-04T05:46:25+5:302019-02-04T05:47:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेत, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला.
- एस. पी. सिन्हा
पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेत, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला. देश का चौकीदार चोर है, असा आरोपही त्यांनी पुन्हा केला.
पाटण्याच्या गांधी मैदानावरील प्रचंड रॅलीत राहुल गांधी म्हणाले की, मोदी जिथे जातात तिथे भरभरून आश्वासने देतात. नितीशकुमारही असेच वागत आहेत. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली. ही ऐतिहासिक घोषणा असल्याचे भाजपाला वाटत आहे मात्र शेतकºयांना दिलेली मदत तुटपुंजी आहे. त्यांच्या वाट्याला दरदिवशी फक्त १७ रुपयेच येणार आहेत.
राहुल गांधी म्हणाले की,मोदींचा नोटाबंदीचा निर्णय हा मोठा घोटाळा होता. या निर्णयाद्वारे मोदींनी गरीबांच्या खिशातील पैसे काढून ते श्रीमंतांना देऊ केले. प्रत्येक नागरिकाच्या बँकखात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार असेही पंतप्रधान म्हणाले होते पण त्या पैशांचाही अजून पत्ता नाही. राफेल विमान घोटाळ्याबाबतही सरकार गप्प बसून आहे. झाले असून त्यांची चौकशी करण्यास सरकार तयार नाही. आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाचा आम्ही पराभव करणारच.