व्यंकय्या नायडूंनी मोदी यांचा असंसदीय शब्द कामकाजातून काढला; विरोधकांवर केला होता हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 05:16 AM2020-02-08T05:16:04+5:302020-02-08T06:25:27+5:30
नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत केलेल्या भाषणातील ‘झूठ’ हा शब्द राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी कामकाजातून वगळला आहे. शुक्रवारी नायडू यांच्या कार्यालयाने काढलेल्या अधिकृत आदेशात पंतप्रधानांच्या निवेदनातील नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरवरील ‘झूठ’ हा शब्द वगळण्यात आल्याचे म्हटले.
नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला. विशेष म्हणजे मोदी यांनीही त्यांच्या भाषणात ‘गुमराह’ हाच शब्द वापरला होता. मोदी यांच्या भाषणातील शब्द नायडू यांनी वगळण्याची ही दुसरी वेळ होती.
११ ऑगस्ट, २०१८ रोजी मोदी यांनी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांच्यावरील भाष्यांत वापरलेले काही शब्द नायडू यांनी वगळले होते. नायडू यांनी राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी ते तीन शब्द कामकाजातून काढून टाकावेत अशी मागणी करताना त्या शब्दांचा केलेला संदर्भदेखील वगळला. त्या शब्दांबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर हक्कभंगाची नोटीस आणण्याचीही चर्चा सुरू होती.
काय होती टीका?
नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा-सीएए आणि एनपीआरवर विरोधकांवर (काँग्रेस) कडवट हल्ला करताना मोदी यांनी विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता. यामुळे गुरुवारपर्यंत चाललेल्या चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण झाला.
च्सभागृहाचा मूड काही वेगळाच आहे हे लक्षात घेऊन नायडू यांनी तो शब्द कामकाजातून काढून टाकला. ते म्हणाले, जे काही असंसदीय आहे ते काढून टाकले गेले आहे.