"आमचं पेमेंट तर करा..."; राहुल गांधींच्या भारत जोड़ो न्याय यात्रेतील वाहनांचे मिळाले नाहीत पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:12 PM2024-04-03T12:12:37+5:302024-04-03T12:30:00+5:30
राहुल गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप आता करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी पैसे न मिळल्याचं म्हटलं आहे. भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी असलेल्या 25 हून अधिक वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप बुलंदशहरच्या अनुपशहर कोतवाली भागातील रोरा गावातील रहिवासी मोती, सतेंद्र, धर्मेंद्र आणि रामकिशन यांनी केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेतील जबाबदार लोकांना अनेक वेळा विनंती करून देखील आम्हाला वाहनांचे पूर्ण पैसे मिळाले नसल्याचं या लोकांनी म्हटलं आहे. "आमचं पेमेंट तर करा..." अशी मागणी ते वारंवार करत आहेत. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत आमच्या कंटेनर वाहनांचा समावेश होता, मात्र या वाहनांचं लाखो रुपयांचं भाडं अद्याप बाकी आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
काँग्रेस पक्षाने यापूर्वी गेल्या वर्षी काढलेल्या यात्रेतील वाहनांची थकबाकीही अद्याप दिली नसल्याचंही सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपा उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौतने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांना कदाचित लोकशाहीची व्याख्या माहीत नाही असं म्हणत पलटवार केला आहे.
राहुल गांधी सतत देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असं म्हणतात. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं असा प्रश्न कंगनाला पत्रकारांनी विचारला. त्यावर कंगना राणौत म्हणाली की, "जर लोकशाहीची हत्या होत आहे, तर आपण कशाची तयारी करतोय? लोकांची मन जिंकणं, लोकांकडून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणं, लोकांना आपण सहकार्य करणं, त्यांचा तुमच्यावर विश्वास असणं."
"प्रेम असणं, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असणं ही लोकशाहीची हत्या आहे का? हीच लोकशाही आहे. कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही." भाजपा हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागा जिंकेल आणि आगामी निवडणुकीत '400 पार' करण्याचं लक्ष्य गाठेल असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे.