“काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 07:55 PM2024-09-02T19:55:18+5:302024-09-02T19:58:32+5:30
Congress MP Abhishek Manu Singhvi News: राहुल गांधी गांभीर्याने अनेक मुद्यांवर काम करत असून त्यांचे समर्पण त्यातून पाहायला मिळते. ते जे बोलतात आणि करतात, त्यात फरक नाही, असे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे.
Congress MP Abhishek Manu Singhvi News: अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. ४०० पारचा नारा देणारी भाजपा २४० जागांवर मर्यादित राहिली. दुसरीकडे इंडिया आघाडीने एकत्रितपणे जोरदार कमबॅक करत एनडीएला चांगलाच घाम फोडला. पंरतु, घटक पक्षाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली. यातच वर्षभरात मोदी सरकार कोसळेल, असा दावा इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील, असे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे.
इंडिया आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर लोकसभेत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले. पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरले. एक्सवर पोस्ट शेअर करत सातत्याने एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि नुकतेच तेलंगणा राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करताना मोठे विधान केले आहे.
काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार
राहुल गांधी गांभीर्याने अनेक मुद्यांवर काम करत असून त्यांचे समर्पण त्यातून पाहायला मिळते. काँग्रेसचे सरकार ज्यावेळी स्थापन होईल, तेव्हा राहुल गांधी पंतप्रधानपदाचे शंभर टक्के दावेदार असतील. राहुल गांधी जे बोलतात आणि करतात, त्यात फरक नाही. जे राहुल गांधी यांची चेष्टा करायचे, त्यांना आता धक्का बसलेला आहे. राहुल गांधी एखाद्या गोष्टीबाबत दुहेरी भूमिका घेत नाहीत, ते मुद्यांवर थेट भाष्य करतात, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांचे गांभीर्य प्रत्येक घटकाला समजले आहे. राहुल गांधी ज्या गोष्टी बोलतात तेच करतात, असा विश्वास लोकांना पटला आहे. राहुल गांधी यांनी गांभीर्य आणि सन्मान कमावला आहे, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.