कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 07:27 PM2019-07-24T19:27:43+5:302019-07-24T19:28:24+5:30
भाजपाच्या आमदारांचं काँग्रेसच्या बाजूनं मतदान
भोपाळ: कर्नाटकात काँग्रेस, जेडीएस सरकार कोसळल्यानंतर मध्य प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती घडेल, असा दावा करणाऱ्या भाजपाला धक्का बसला. कर्नाटकात ऑपरेशन लोटस राबवल्यानंतर मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमलनाथ' सुरू केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयकावरील मतदानावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला साथ दिली. यावरुन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला.
काँग्रेसकडून अल्पमतातलं सरकार चालवलं जातं. त्यांचं सरकार कधीही कोसळेल, असा दावा कायम भाजपाकडून केला जातो. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायद्यावरील सुधारणा विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपाच्याच दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. या विधेयकावरील मतदानादरम्यान कमलनाथ यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.
Madhya Pradesh CM Kamal Nath: Everyday BJP says we are a minority govt and one which could fall any day. Today in voting in assembly(on criminal law amendment), two BJP MLAs voted in favour of our Govt pic.twitter.com/4rN6pFzCbB
— ANI (@ANI) July 24, 2019
आज विधानसभेत सुधारणा विधेयकावर मतदान झालं. त्यावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता होती. तर कर्नाटक गमावलेल्या काँग्रेसला भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे कालच भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील काँग्रेस सरकार कोसळू शकतं, असे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सपा-बसपामधील अंतर्गत लाथाळ्यांचा उल्लेख केला होता.
'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले होते. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं.