MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 02:48 AM2020-03-10T02:48:29+5:302020-03-10T06:56:09+5:30

मध्यप्रदेशमधील तीन मंत्र्यांसह १७ आमदारांना बंगळुरूला हलविले

MP Politics: Jyotiraditya meets Modi, Amit Shah? Speed up the movements to oust the Kamal Nath government | MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

Next

भोपाळ : मध्यप्रदेश विधिमंडळाच्या १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकार विरोधात भाजप विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेल्या राज्यातील तीन मंत्र्यांसह १७ आमदार बंडाच्या पवित्र्यात असून त्यांना भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकमधील बंगळुरू येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी रात्री ज्योतिरादित्य शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असून त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती असणार आहे.

सरकार पडू नये व काँग्रेसमधील फूट टळावी म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष किंवा राज्यसभा सदस्य केले जाण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणाºया काँग्रेस नेतृत्वाने आपल्याला डावलले असा सल ज्योतिरादित्य यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आता बंडाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. १७ आमदार बंगळुरू येथे ज्या ठिकाणी राहात आहेत तिथे ४०० पोलीस सुरक्षेसाठी तैनात आहेत. या आमदारांनी आपले मोबाइल बंद ठेवले आहेत.

मुख्यमंंत्री कमलनाथ यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली व ते भोपाळला परतले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, सोनिया गांधी अनेक गोष्टींबाबत मला मार्गदर्शन केले असून त्यानुसारच पुढची पावले उचलणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेचे खासदार करणार का या प्रश्नावर कमलनाथ यांनी मौन बाळगले.

६ मंत्री, ११ आमदार आहेत बंगळुरूत
मंत्री : तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, प्रद्युम्न सिंह तोमर, इमरती देवी, प्रभुराम चोधरी, महेंद्र सिसोदिया.
आमदार : मुन्ना लाल गोयल, गिरीराज दंडोतिया, ओ. पी. भदोरिया, विरजेंद्र यादव,जसपाल जजजी,कमलेश जाटव, राजवर्धन सिंह, रघुराज कंसना, सुरेश धाकड, हरदीप डंग, रक्षा सिरोनिया जसवंत.

२० मंत्र्यांचे राजीनामे
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशिरा कॅबिनेट बैठक बोलावून मंत्र्यांचे राजीनामे घेतले. भोपाळमध्ये हजर २० मंत्र्यांनी राजीनामे दिले. मुख्यमंत्र्यांशिवाय २८ मंत्री आहेत. ८ मंत्री संपर्कात नाहीत. मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आहे.

शिवराज सिंह चौहान विधिमंडळ पक्षाचे नेते?
भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारच्या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रभारी महासचिव विनय सहस्त्रबुद्धेही सकाळी भोपाळला पोहचत आहेत. दरम्यान, मंगळवारी भाजप संसदीय बोर्डाची बैठक बोलाविली आहे.

Web Title: MP Politics: Jyotiraditya meets Modi, Amit Shah? Speed up the movements to oust the Kamal Nath government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.