MP Politics: राज्यपाल परतल्यानंतर येणार घडामोडींना वेग; काँग्रेस नेत्यांचे शिंदे यांच्यावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:59 AM2020-03-11T04:59:33+5:302020-03-11T06:39:13+5:30
सप, बसपच्या नेत्यांनी घेतली शिवराजसिंह यांची भेट
नवी दिल्ली/भोपाळ : सध्या लखनौत असलेले मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन भोपाळमध्ये पोहोचल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल, असे मानले जाते. आमदारांच्या राजीनाम्यासह राजकीय घटनांवर मी लक्ष ठेवून आहे. घटनेच्या दृष्टीने योग्य निर्णय मी घेईन, अशी प्रतिक्रिया टंडन यांनी काही वाहिन्यांशी बोलताना दिली.
कुटुंबीयांसोबत होळीचा आनंद लुटण्यासाठी टंडन सध्या सुट्टीवर आहेत. मी राजभवनावर पोहोचलो, की योग्य निर्णय घेईन. एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. बहुजन समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार काँग्रेसच्या कमलनाथ सरकारमध्ये आहेत. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा देताच बसपच्या संजीव सिंग कुशवाह आणि सपच्या राजेश शुक्ला या आमदारांनी भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. होळीनिमित्त ही सदिच्छा भेट होती, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना चौहान यांनी दिली.
कुशवाह आणि शुक्ला यांनी गेल्या आठवड्यांत फोन बंद केले होते. ते बेपत्ता झाले होते. तेव्हा त्यांच्या अपहरणाचा आरोप काँग्रेसने केला होता. ४ मार्चला भोपाळमध्ये परतल्यानंतर दोन्ही आमदारांनी भाजपने अपहरण केल्याचा आरोप फेटाळून लावला होता.
ज्योतिरादित्य शिंदे भाजपसोबत जाणार असल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसच्या विविध नेत्यांनी त्यांच्यावर संधिसाधूपणाचा, सत्तेसाठी हपापल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, ‘राष्ट्रीय संकटा’वेळी वेळी भाजपशी हातमिळवणी केल्याने शिंदे यांनी जनतेसोबतच स्वत:च्या विचारधारेशीसुद्धा विश्वासघात केला आहे. असे लोक सत्ता नसेल तर
जगू शकत नाहीत, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे असे लोक पक्षातून जेवढ्या लवकर बाहेर पडतील तेवढे चांगले आहे.
काँग्रेसचे अन्य नेते अधीररंजन चौधरी यांनी शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. जेव्हा पक्ष कठीण काळात असतो तेव्हा पक्षाला सोडून जाणे ही बेईमानी आहे, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. भाजप आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पक्षाला जर तुम्ही बळ देणार असाल, तर पक्षाला त्या विरोधात कारवाई करावीच लागेल. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे फार बरे झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार टिकणार नाही, हे चौधरी यांनी मान्य केले.
सोनिया-गेहलोत चर्चा
मध्ये प्रदेशातील घडामोडींनंतर राजस्थानातील सत्तेला दगाफटका होऊ नये. नाराज असलेले सचिन पायलट यांच्या गटाने उचल खाऊ नये, यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी लगोलग चर्चा केली आणि तेथील राजकीय परिस्थिती समजावून घेतली.
पायलट, देवरा बाकी है
ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात वेगवेगळ््या राजकीय टिप्पणीला वेग आला. मध्ये प्रदेशात सत्ता येणार या कल्पनेने खुश झालेल्या भाजपच्या नेत्यांनी ‘ये तो सिर्फ झाँकी है, सचिन पायलट, मिलिंद देवरा बाकी है’ असे संदेश पसरवण्यास सुरूवात केली. राजस्थानमझील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी पटत नसल्याचा आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा पक्षावर नाराज असल्याचा संदर्भ या विधानांना होता.