MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:20 AM2020-03-10T00:20:46+5:302020-03-10T06:55:13+5:30
Madhya Pradesh Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशीरा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. आणि ते मान्यही करण्यात आले आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मध्यप्रदेशातील भाजपाने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे.
कमलनाथ यांनी सांगितले की, जे लोक माफियाच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कधी यशस्वी होऊ देणार नाही. माझी सर्व ताकद आणि विश्वास मध्य प्रदेशातील जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे लोकांनी बनवलेल्या या सरकारला पाडण्याचं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकणार नाही असं ते म्हणाले.
Umang Singhar, Congress: All the 20 ministers who were here, have tendered their resignations. CM can reconstitute the state cabinet now. All are together. Scindia ji (Jyotiraditya Scindia) also is with Congress. Agar mantrimandal banana hai toh sarkar surakshit hai. pic.twitter.com/4S909iNXSq
— ANI (@ANI) March 9, 2020
काय आहे कमलनाथ यांची योजना?
कमलनाथ हे सरकारवर आलेल्या संकटापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नाराज चेहरे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Bhopal: Earlier visuals of the meeting of #MadhyaPradesh CM Kamal Nath and the cabinet ministers. All cabinet ministers present in the meeting have tendered their resignation to the Chief Minister and all resignations have been accepted. pic.twitter.com/w6xGn6iLEI
— ANI (@ANI) March 9, 2020
मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांसह काँग्रेसच्या एकूण १७ आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हे मंत्री आणि आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील असून, स्वत: शिंदेही बंडाच्या पावित्र्यात असून, त्यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्यात उदभवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण तीन गट आहेत. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. तेव्हा कमलनाथ यांनीही ज्यांना रस्त्यावर उतरायचे आहे त्यांनी उतरावे असे आव्हान दिले होते.