'माझ्या भारतमातेची तुम्ही हत्या केली'; मणिपूरवरून राहुल गांधी लोकसभेत कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:48 PM2023-08-09T12:48:22+5:302023-08-09T13:02:19+5:30
Parliament No-confidence Motion Debate: मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
नवी दिल्ली: आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अविश्वास ठरावावर बोलत आहेत. भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी आपल्याला लोकसभेत घेतलं याबाबत लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. तसेच मागील वेळी मी जेव्हा अदानी यांच्यावर बोललो तेव्हा काहींना त्रास झाला. यावेळी मी हृदयापासून, मनापासून बोलणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले.
मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. मी जेव्हा मणिपूरला गेलो होतो, तेव्हा तेथील स्थानिक नागरिकांशी, पीडित लोकांसोबत संवाद साधला. त्यावेळी एक महिला म्हणाली की, माझ्या डोळ्यांसमोर मुलाची गोळ्या घालून हत्या केली. रात्रभर ती आई त्या मृतदेहासोबत राहिली, असं राहुल गांधी यांनी सांगितले.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi says, "A few days back, I went to Manipur. Our PM didn't go, not even to this day, because for him Manipur is not India. I used the word 'Manipur' but the truth is that Manipur does not remain anymore. You have divided Manipur into two. You have… pic.twitter.com/QodCZnLHWs
— ANI (@ANI) August 9, 2023
मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. भारताचा आवाज एकच आहे. द्वेष दूर करावा लागेल. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरला गेलेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. आज मणिपूर हे मणिपूर राहिलेले नाही. तुम्ही मणिपूर तोडले आहे. तुम्ही भारत मातेची हत्या केली. तुम्ही भारत मातेची हत्या करणारे आहात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या या विधानावरुन सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रावण फक्त दोन लोकांचे ऐकत असे, मेघनाद आणि कुंभकर्ण. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी हे अमित शाह आणि अदानी या दोनच लोकांचे ऐकतात. हनुमानाने लंका जाळली नाही, अहंकाराने लंका जाळली. रामाने रावणाला मारले नाही, त्याच्या अहंकाराने मारले. तुम्ही देशभर रॉकेल फेकत आहात. तुम्ही हरियाणा जाळत आहात. तुम्ही संपूर्ण देश पेटवण्यात व्यस्त आहात, असा निशाणा राहुल गांधींनी भाजपावर साधला.
काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्याशिवाय रेवंत रेड्डी आणि हेबी एडन यांची नावे चर्चेसाठी देण्यात आली आहेत. त्याचवेळी विरोधकांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अविश्वास प्रस्तावावर सरकारची बाजू मांडणार आहेत. यानंतर गृहमंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, हिना गावित, रमेश बिधुरी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतील. राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसच्या वतीने चर्चेला सुरुवात करणार होते,मात्र काँग्रेसने शेवटच्या क्षणी आपली रणनीती बदलून गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली.