'काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम महिलांचाही आहे?'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:31 PM2018-07-14T17:31:10+5:302018-07-14T18:10:56+5:30
तिहेरी तलाकच्या विधेयकाबाबत त्यांनी घेतलेल्या बाजूमुळे त्यांची अल्पसंख्यांकांबाबतची भूमिका उघड झाली आहे'. असा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्ष यांच्यावर टीका केली.
आझमगड- काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष मुस्लीमांचा आहे असे वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी असे वाक्य उच्चारल्याचे वृत्त इन्किलाब या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे असे काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आणि राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही केली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे.
आझमगड येथील भाषणामध्ये पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, 'काँग्रेस हा मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम स्त्रियांचाही आहे? ' इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी राहुल गांधीसह काँग्रेसच्या नेत्यांनी तिहेरी तलाकचे परिणाम भोगणाऱ्या महिलांना भेटावे आणि मगच त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावे असा सल्लाही दिला. हे विधेयक विरोधकांनी अडवल्यामुळे मुस्लीम महिलांच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे अशी टीका त्यांनी केली. 340 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस रस्त्याचे भूमिपूजन केल्यावर ते बोलत होते.
I have read in newspaper that Congress President has said that Congress is a party of Muslims, I am not surprised by this. All I want to ask is, is their party only for Muslim men or for women too? Ye log sansad mein kanoon dabakar baith jaate hain: PM Narendra Modi pic.twitter.com/xfiEbakWaY
— ANI UP (@ANINewsUP) July 14, 2018
आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडली नाही. ''अनेक इस्लामिक देशांनी तिहेरी तलाक आणि निकाह हलाला या प्रथा बंद केल्या असल्या तरी काँग्रेससह अनेक पक्षांनी ते कायम ठेवले आहेत. जे राजकीय नेते मला पंतप्रधानपदावरुन बाजूला करण्यासाठी एकत्र येत आहेत त्यांनी हलाला आणि तिहेरी तलाकमुळे नुकसान झालेल्या महिलांना भेटून संसदेत या विधेयकावर चर्चा करायला हवे. या पक्षांनी कितीही अडथळे आणले तरी हे विधेयक संसदेत संमत होईल असे आश्वासन मी मुस्लीम महिलांना देतो'' असे त्यांनी यावेळेस सांगितले.
'काँग्रेस पक्ष हा मुस्लीम पुरुषांचाच आहे की त्यात मुस्लीम महिलांचाही समावेश होतो हे मला नामदार (राहुल गांधी) यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कारण त्यांचे बोलणे आणि कृती एकमेकांच्या विरोधात आहे. तिहेरी तलाकच्या विधेयकाबाबत त्यांनी घेतलेल्या बाजूमुळे त्यांची अल्पसंख्यांकांबाबतची भूमिका उघड झाली आहे'. असा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्ष यांच्यावर टीका केली. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीचे काही भाषण भोजपुरी भाषेतून केले. आझमगड हा मुलायम सिंह यादव यांचा मतदारसंघ आहे. पूर्व युरोपातील केवळ याच मतदारसंघात भाजपाला 2014 साली यश मिळाले नव्हते.