"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 06:24 PM2024-07-01T18:24:11+5:302024-07-01T18:49:23+5:30
Parliament Session 2024: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत असं एक विधान केलं, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही सभागृहात उभं राहून त्याचा विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे, असा आरोप भाजपा आणि मोदींनी केला. मात्र राहुल गांधी यांच्या बचावासाठी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) ह्या धावून आल्या आहेत.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान, आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेला सुरुवात केली. तसेच संविधानाच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर चौफेर टीका केली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संविधानाची प्रत हातात घेऊन केली. मात्र यादरम्यान, राहुल गांधी यांनी असं एक विधान केलं, ज्यामुळे वादाला तोंड फुटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभागृहात उभं राहून त्याचा विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे, असा आरोप भाजपा आणि मोदींनी केला. मात्र राहुल गांधी यांच्या बचावासाठी प्रियंका गांधी ह्या धावून आल्या आहेत. राहुल गांधी यांनी हे विधान भाजपाला उद्देशून केलं आहे. हिंदू समाजाला उद्देशून नाही, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये एके दिवशी सांगितलं होतं की, भारताने कधीही कुणावर हल्ला केलेला नाही. याचं कारण म्हणजे भारत अहिंसेला मानणारा देश आहे. भारत घाबरत नाही. आमच्या महापुरुषांनी घाबरू नका आणि घाबरवू नका, असं सांगितलंय. भगवान शिव सांगतात, घाबरू नका आणि घाबरवू नका आणि ते त्रिशूळ जमिनीमध्ये गाडतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ तास केवळ हिंसा, हिंसा, हिंसा आणि द्वेष, द्वेष, द्वेश करत असतात. तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हिंदू धर्मात सत्याची साथ दिली पाहिजे, असं स्पष्टपणे लिहिलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपा आणि सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही खुर्चीवरून उठून उभे राहिले. तसेच संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. त्यावर राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपा हा संपूर्ण हिंदू समाज असू शकत नाही, असं विधान केलं.