मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडलं; व्हॅलेंटाईन डेला राहुल गांधींचा 'प्रेम राग'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:47 PM2019-02-14T12:47:10+5:302019-02-14T12:49:20+5:30
काँग्रेस-भाजपाचा संघर्ष वैचारिक असल्याचं म्हणत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
अजमेर: सध्या देशात दोन विचारसरणींमध्ये लढा सुरू आहे. एका बाजूला भाजपा-संघाची विचारधारा आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसची विचारसरणी आहे, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. अजमेरमध्ये सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. आम्ही मात्र प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात. काँग्रेस संपवायची भाषा करतात. मात्र मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडतं आहे, असं राहुल गांधी सेवादलाला संबोधित करताना म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आक्रमक पवित्र्यात आहेत. राफेल विमान खरेदी करारावरुन राहुल दररोज मोदींना लक्ष्य करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावरुनही ते सतत मोदींना लक्ष्य करत आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं राहुल गांधी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दोन राज्यांमध्ये ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि जनसभांना संबोधित करतील. राजस्थानात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला आहे. याशिवाय जवळपास सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसनं भाजपाला टक्कर दिली होती.
राजस्थानात काँग्रेस 20 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला. राजस्थानात लोकसभेच्या 25 जागा आहेत. या सर्वच्या सर्व जागा भाजपानं गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. राजस्थाननंतर काँग्रेस अध्यक्ष मोदींचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातचा दौरा करतील. गुजरातमधील वलसाडमध्ये राहुल एका जनसभेला संबोधित करतील. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाला जोरदार लढत दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येणार असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.