'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 02:15 PM2019-12-14T14:15:54+5:302019-12-14T15:30:58+5:30
नरेंद्र मोदींनी काय करून ठेवले ? आता हे लोक कांदे हातात घेऊन बसले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली - महिलांवर होणाऱ्या आत्याचारांवरून सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपकडून लोकसभेत लक्ष्य करण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या मागणीचा राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी सावरकरांचे नाव घेऊन केंद्र सरकारला डिवचले.
राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या 'भारत बचाव' सभेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत भाजपवर हल्ला चढवला. भाजपकडून माफीच्या मागणीचा समाचार घेत ते म्हणाले की, 'माझ नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही. मी सत्यासाठी कधीही माफी मागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मागायची आहे. मोदींसह त्यांचा असिस्टंट असलेल्या अमित शाह यांनी देशाची माफी मागायची आहे.
देशाची आत्मा आणि शक्ती अर्थव्यवस्था आहे. संपूर्ण जग आपल्याकडे पाहायचे. हा देश वेगवेगळ्या धर्मांचा, जातींचा आणि विचारधारांचा आहे. या देशाचा जीडीपी 9 वर कसा असा विचार इतर देश करत होते. परंतु, नरेंद्र मोदींनी काय करून ठेवले ? आता हे लोक कांदे हातात घेऊन बसले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.