Nambi Narayanan ISRO Spy Case : 'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 01:24 PM2023-01-14T13:24:17+5:302023-01-14T13:24:57+5:30
Nambi Narayanan ISRO Spy Case: प्रसिद्ध शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्यावर पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता.
Nambi Narayanan ISRO Spy Case: 1994 च्या कुप्रसिद्ध इस्रो(ISRO) हेरगिरी प्रकरणात एरोस्पेस शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांची अटक बेकायदेशीर होती, कुठलीही वैज्ञानिक माहिती लीक झाली नाही. त्यांना खोट्या हेरगिरी प्रकरणात अडकवण्यात आलं, अशी मोठी माहिती सीबीआयने(CBI) शुक्रवारी केरळउच्च न्यायालयात दिली. नंबी नारायणन हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमधील प्रमुख लिक्विड प्रोपेलंट इंजिन वैज्ञानिक होते.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय तपास करत असलेल्या लोकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर नव्याने सुनावणी झाली. सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं की, हेरगिरी प्रकरणात नंबी नारायणन यांना अडकवण्याचा आंतरराष्ट्रीय कट होता. या संबंधी केस डायरी मंगळवारी प्रसिद्ध केली जाईल. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आरोपींची कोठडीत चौकशी आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये.
काय होतं प्रकरण?
नंबी नारायणन यांना हेरगिरी प्रकरणात गोवण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मालदीवच्या नागरिकाच्या माध्यमातून पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. 1998 मध्ये सीबीआय न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण, यादरम्यान त्यांनी सहयोगी शास्त्रज्ञ डी. शशीकुमार आणि इतर चार जणांसह 50 दिवस तुरुंगात घालवले.
नंबी नारायणन यांचा आरोप
1994 च्या खटल्यात नंबी नारायणन यांना त्यांचं नाव या खटल्यातून पूर्णपणे काढून टाकायचं होतं. तसेच, नुकसान भरपाईसाठी आणि त्यांना फसवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी त्यांनी कायदेशीर लढाईही लढली. त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये आरोप केला आहे की, ज्या कटकारस्थानांची आणि लोकांची आता चौकशी केली जात आहे, ते अमेरिकेची गुप्तचर संस्था (CIA) सोबत भारताच्या अंतराळ कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी काम करत होते.
नंबी यांच्या आयुष्यावर चित्रप
नंबी नारायणन यांनी त्यांच्या आयुष्याव एक पुस्तक लिहिले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच अभिनेता आर माधवन याने नंबी यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही काढला. त्या चित्रपटात नंबी यांच्या आयुष्यातील संपूर्ण संघर्ष दाखवण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय माधवनन यानेच केला. हा चित्रपट आता ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे.