कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? 'या' चार नावांची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:43 AM2019-06-21T04:43:06+5:302019-06-21T06:14:24+5:30
पक्षाने घ्यावा निर्णय; राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अजिबात मागे घेणार नाही आणि नवा अध्यक्ष पक्षानेच निवडावा, असे पुन्हा स्पष्ट केल्याने काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. कोणत्याही वाद वा मतभेदाविना आणि सर्वसंमतीने नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेते आता प्रयत्न करू लागले आहेत.
नवा पक्षाध्यक्ष ठरवण्यात राहुल गांधी स्वत: सहभागी होणार नसले तरी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. आपण नव्या अध्यक्षाबाबत कोणाशी चर्चाही करणार नाही, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना सांगितले आहे. नवा पक्षाध्यक्ष कोणीही असला तरी त्याला आपण सहकार्य करू आणि त्याच्यासह काम करीत राहू, असेही राहुल गांधी यांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, पक्षाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांची आहे. याशिवाय सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मीरा कुमार, पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावे पुढे आली आहेत.पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल हे मुकुल वासनिक यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांचजे निकटवर्तीय असल्याने त्यांना अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असल्याचे अनेक नेत्यांना वाटते.
अँथनी, मोईलींना नको पद
ए. के. अँथनी यांचे नाव पुढे आले होते. पण आपल्याला हे पद नको असून, राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी राहायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. वीरप्पा मोईली यांनीही राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे म्हटले आहे.