बुमरँग! राहुल गांधींच्या आवाहनानंतर नमो अॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 02:09 PM2018-03-30T14:09:00+5:302018-03-30T14:10:57+5:30
काँग्रेसच्या टीकेमुळे नुकसान होण्याऐवजी उलट Namo App ला फायदाच झाल्याचा दावा भाजपाने केला आहे.
नवी दिल्ली: राजकारणात प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा एखादा डाव आपल्यावरच कसा उलटू शकतो, याचे प्रत्यंतर सध्या काँग्रेस पक्षाला येत असावे. काही दिवसांपूर्वी सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी फेसबुकवरील जनमत चाचणी (पोल) काँग्रेसच्या अंगलट आला होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसवर अशाप्रकारची नामुष्की ओढवली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी NamoAppच्या माध्यमातून डेटाचोरी होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने नमो अॅपविरोधात #DeleteNamoApp अशी मोहिमच सुरु केली होती. मात्र, काँग्रेसची ही खेळी त्यांच्यावरच उलटल्याचे आता निदर्शनाल आले आहे.
भाजपाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने नमो अॅपविरोधात मोहिम सुरु केल्यापासून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. या अॅपला मिळणाऱ्या नेहमीच्या प्रतिसादाच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेमुळे नुकसान होण्याऐवजी उलट Namo App ला फायदाच झाल्याचा दावा भाजपाने केला आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी फेसबुकवरील काँग्रेसचा एक पोल रिट्विट करून काँग्रेसचे दात घशात घातले होते. काँग्रेस पक्षाकडून सोमवारी ट्विटरवर एक पोल घेण्यात आला होता. यामध्ये त्यांनी इराकमधील 39 भारतीयांच्या मृत्यू हे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अपयश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर हो किंवा नाही, असे दोन पर्याय देण्यात आले होते. साधारण 34 हजार लोकांनी यावर कौल दिला होता. यापैकी 76 टक्के लोकांनी यासाठी सुषमा स्वराज जबाबदार नसल्याचे सांगत 'नाही' या पर्यायावर क्लिक केले होते. तर 24 टक्के लोकांनी 'होय' या पर्यायावर क्लिक केले. साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली.
We all know that Rahul Gandhi is no match for Narendra Modi. But seeing his fright about the Namo App, is very amusing. When his bots tried to trend #DeleteNamoApp day before yesterday, the popularity and downloads of Namo App only increased. Today, it will be no different! pic.twitter.com/Wnan0IQFIV
— BJP (@BJP4India) March 25, 2018
मात्र, त्यानंतर सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका स्मार्ट खेळीने काँग्रेस आणखीनच तोंडघशी पडला. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलेला हा पोल रिट्विट केला. स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा पोल पाहून अनेकांनी कमेन्टमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी स्वराज यांनी ही संधी अचूक साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.