नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:29 PM2020-01-30T13:29:39+5:302020-01-30T14:42:02+5:30
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली आहे.
वायनाड - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकच असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज वायनाडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये संविधान बचाओ सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी गांधी हत्येचा धागा पकडून नरेंद्र मोदींवर निषाणा साधला. ''महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी एकच आहे. त्यात काहीच फरक नाही. केवळ माझी नथुराम गोडसेवर श्रद्धा आहे, हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये नाही,''असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
यावेळी केंद्राने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित असलेल्या एनआरसीवरही टीका केली,''देशवासीयांना सध्या ते भारतीय असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. मी भारतीय आहे किंवा नाही हे निश्चित करणारे नरेंद्र मोदी कोण? कोण भारतीय आणि कोण नाही हे निश्चित करण्याचा परवाना त्यांना कुणी दिला. मला माहिती आहे की मी भारतीय आहे. मग ही बाब मी कुणासमोर सिद्ध करण्याची गरज नाही,'' असेही राहुल गांधी म्हणाले.
देशातील बेरोजरागी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरूनही राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. नरेंद्र मोदींना जेव्हा बेरोजगारी आणि नोकऱ्यांसदर्भात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. जम्मू काश्मीरमधील सध्याची परिस्थिती आणि आसामचे पेटण्यामुळेही तुम्हाला रोजगार मिळणार नाहीत, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.