"राहुल गांधी हे शहिदजादे तर जय शाह शहजादे"; मोदींचा प्रचार भरकटल्याची काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:49 PM2024-05-17T15:49:14+5:302024-05-17T15:51:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाबाबत केलेल्या दाव्यावर काँग्रेसने टीकास्त्र डागलं आहे.
Congress On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे प्रचारसभांमधून विरोधकांवर तुटून पडले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहजादे असा उल्लेख करुन त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच निवडणूक हारल्यानंतर राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचेही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या टीकेवर आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुवीकरणावर भर द्यावा लागत असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी सध्या मुलाखती देत सुटले आहेत पण ते जे बोलतात त्यातून त्यांचेच हसे होत आहे. मोदीजी असे कोणते औषध घेतात की काल काय बोलले ते आज विसरतात आणि भलतेच बोलतात. मोदींच्या मुलाखती म्हणजे कपिल शर्माचा कॉमेडी शो वाटतो आहे. युक्रेन युद्ध थांबवले म्हणणारे नरेंद्र मोदी आता गाजा पट्टीतील युद्ध थांबवल्याची शेखी मिरवत आहेत. मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत. मणिपूरचे नाव घ्यायची त्यांची हिम्मत झाली नाही आणि युद्ध थांबवल्याच्या बाता मारतात, असा टोला पवन खेरा यांनी लगावला आहे.
"नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचे हसे करुन ठेवले आहे. राहुल गांधी यांना शहजादे म्हणतात आणि राहुल गांधी बद्दल प्रश्न विचारताच कोन राहुल, असा उटला प्रश्न विचारतात. राहुल गांधी शहजादा नाहीत तर शहिदजादे आहेत आणि देशात एकच शहजादा आहे आणि तो म्हणजे अमित शाह यांचा मुलगा जय शाह," असा टीकाही पवन खेरा यांनी केली.
"महाराष्ट्रात दोन पक्ष फोडणारी भाजप खरी तुकडे तुकडे गँग आहे आणि लोकांना ही तोडफोड अजिबात आवडलेली नाही. महाराष्ट्रात इंडिया आघाडीची हवा दिसत आहे आणि महाराष्ट्रातील वातावरणाचा परिणाम गुजरातसह देशभरात दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इंडिया आघाडी ३५ जागा जागांवर विजयी होईल. ४ जूनला नरेंद्र मोदी यांना झोळी घेऊन निघावे लागले. त्यामुळे त्यांनी नागपुरला दिक्षाभूमीवर जाऊन आत्मचिंतन करावे," असा सल्लाही पवन खेरा यांनी दिला आहे.