जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 11:03 AM2019-05-12T11:03:05+5:302019-05-12T11:04:29+5:30
जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल
नवी दिल्ली - जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मताधिकार बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मताधिकार बजावल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, ''ही निवडणूक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत चांगली लढाई झाली. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल असा मला विश्वास आहे.''
Congress President Rahul Gandhi after casting his vote: The election was fought on key issues including demonetization, farmer problems, Gabbar Singh Tax and corruption in #Rafale. Narendra Modi used hatred in the campaign and we used love and I am confident love will win pic.twitter.com/gE1BgvQzPc
— ANI (@ANI) May 12, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि व्देषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करत असतात. पण आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले होते. मोदींना संताप अनावर झाल्याने ते माझे वडील, आजी व आजोबांवर टीका करतात. ते मत्सर पसरवितात. मात्र मी त्यांना प्रेमालिंगन देऊन प्रेमाचा प्रसार करतो, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.