भाजप सरकारविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात; पाटण्यात 23 जून रोजी विरोधकांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:33 PM2023-06-07T20:33:40+5:302023-06-07T20:38:56+5:30
राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांसह अनेक नेते उपस्थित राहणार.
पाटणा: केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटत आहेत. याच अनुषंगाने बिहारच्या पाटण्यात 12 जून रोजी होणारी विरोधकांची बैठक आता 23 जून रोजी होणार आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, केजरीवाल, हेमंत सोरेन, स्टॅलिन, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डी राजा, दीपंकर भट्टाचार्य या नावांसह डावे नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
नितीश कुमार यांच्या पुढाकाराने विरोधी ऐक्यासाठी ही बैठक होत आहे. यापूर्वी 12 जून रोजी बैठक होणार होती, परंतु या दिवशी अनेक नेते बाहेर असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नव्हते. त्यामुळेच तारीख पुढे ढकलण्यात आली. पक्षांना जोडण्यासाठी नितीश कुमार सप्टेंबर 2022 पासून देशभर प्रवास करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचीही त्यांनी दिल्लीत भेट घेतली होती. या भेटींमधून ते भाजपविरोधी पक्षांना एकवटण्याचा प्रयत्न करत आहेत.
फक्त 100 जागांवर भाजपचा पराभव करायचा
भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यातच आता भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांना एकवटण्याचे काम सुरू आहे. तसेच, लोकसभेत भाजपचा 100 जागांवर पराभव करण्याचे लक्ष त्यांनी आखले आहे. ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचे सरकार आहे, तिथे महाआघाडी स्थापन करून भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणने आहे. यामध्ये प्रामुख्याने यूपीमधील 80, बिहारमधील 40, बंगालमधील 42, महाराष्ट्रातील 48, दिल्लीतील 7, पंजाबमधील 13 आणि झारखंडमधील 14 लोकसभेच्या जागांचा समावेश आहे.