नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींना नव्याने बजावले समन्स; आता 'या' दिवशी हजर व्हावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 11:50 AM2022-06-03T11:50:15+5:302022-06-03T11:50:56+5:30
National Herald Case : दोन दिवसांपूर्वी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले होते.
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना १३ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेसने गुरुवारी सांगितले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, परंतु नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात त्या ८ जून रोजी ईडीसमोर हजर होतील.
दोन दिवसांपूर्वी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले होते. यामध्ये राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि.२ जून) व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे, असे या समन्समध्ये म्हटले होते. मात्र, विदेश दौऱ्यावर असल्याने आपल्याला ५ जूननंतर चौकशीला बोलाविण्यात यावे, असे पत्र राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना लिहिले होते. त्यानुसार, आता याप्रकरणी ईडीने राहुल गांधी यांना नव्याने समन्स बजावले असून त्यांना १३ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
Enforcement Directorate issues fresh summons to Congress leader Rahul Gandhi to appear before investigators on June 13 in National Herald case: Official sources
— ANI (@ANI) June 3, 2022
(file pic) pic.twitter.com/jKaQ3nzCES
सोनिया गांधी, राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक
भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर खात्याने चौकशी केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यानुसार नव्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी हे यंग इंडियनचे प्रवर्तक व समभागधारक आहेत.
खरगे, बन्सल यांची आधीच चौकशी
नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे मालक असलेल्या यंग इंडियन या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. तेथील मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीला सोनिया व राहुल गांधी यांचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून प्रसिद्ध केले जाते. या वृत्तपत्रातील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल यांची ईडीने नुकतीच चौकशी केली होती.
सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती गुरुवारी दिली आहे. सुरजेवाला यांना दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना सौम्य स्वरुपाचा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच, सोनियांनी स्वत:ला सध्या आयसोलेट करुन घेतले असून आपल्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे सुरजेवालांनी सांगितले.