'यंग इंडिया कंपनीत ३८ टक्के शेअर का घेतले?', सोनिया गांधींना ED कोण-कोणते प्रश्न विचारणार वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:45 PM2022-07-21T13:45:33+5:302022-07-21T13:46:06+5:30
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरं जात आहेत.
नवी दिल्ली-
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरं जात आहेत. एकीकडे सोनिया गांधी ईडीच्या चौकशीला सामोरं जात आहेत तर दुसरीकडे देशभर काँग्रेस कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींचा जबाब मनी लॉन्ड्रींग कायद्याच्या सेक्शन ५० अंतर्गत नोंदवला जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ईडीकडून विचारले जाणारे प्रश्न खालील नमूद प्रश्नांच्या जवळपास असू शकतात.
१. ईडीकडून सोनिया गांधी यांना यंग इंडिया प्रायव्हेट लिमिडेट कंपनीशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.
२. यंग इंडिया कंपनीमध्ये ३८ टक्के शेअर का विकत घेतले? त्यामागचं नेमकं कारण काय? असाही प्रश्न सोनियांना विचारण्यात येऊ शकतो.
३. सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक का बनल्या? जेव्हा सर्व व्यावहारिक देवाण-घेवाण पूर्ण झाल्या. त्यानंतर संचालक बनणाऱ्या त्या शेवटच्या व्यक्ती होत्या.
४. यंग इंडिया कंपनी नेमकं काय काम करते? जर ही कंपनी धार्मिक संस्था आहे तर कंपनीकडून कोणतंही दानधर्म कार्य अद्याप का झालेलं नाही?
५. ईडी सोनिया गांधी यांना काँग्रेस आणि AJL यांच्यातील व्यवहारांबाबतही प्रश्न विचारू शकते.
६. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी AJLचे शेअरहोल्डिंग विकत घेत असल्याची सोनियांना माहिती होती का, हेही ईडीला जाणून घ्यायचे आहे.
७. AJLच्या संपत्तीबाबत ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. त्याचवेळी, हे देखील विचारू शकते की सोनियांना कोणत्या उद्देशासाठी मालमत्ता वापरल्या जातात याची माहिती होती का?
सोनियांची पहिल्यांदाच चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची पहिल्यांदाच ईडीकडून चौकशी होत आहे. याआधी ईडीनं राहुल गांधी यांची जवळपास वेगवेगळ्या दिवशी एकूण मिळून ५० तास चौकशी केली होती. याप्रकरणात सध्या सोनिया आणि राहुल गांधी जामीनावर बाहेर आहेत.