राहुल गांधींना न भेटताच परतले सिद्धू ; तीन दिवस वाट पाहूनही निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 15:34 IST2019-06-22T15:34:36+5:302019-06-22T15:34:51+5:30
याआधी १० जून रोजी सिद्धू यांनी प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत राहुल यांची भेट घेतली होती. तसेच आपली बाजू मांडली होती. त्यावेळी पंजाबमध्ये सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील दुरावा कमी करण्याच्या सूचना अहमद पटेल यांना करण्यात आल्या होत्या.

राहुल गांधींना न भेटताच परतले सिद्धू ; तीन दिवस वाट पाहूनही निराशा
नवी दिल्ली - पंजाब सरकारचे मंत्री आणि काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू मागील तीन दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र राहुल यांच्याकडून भेटीसाठी निरोप न आल्याने अखेर गुरुवारी सिद्धू पंजाबला परतले. गेल्या एक महिन्यांपासून राहुल कुणालाही भेटत नसल्याचे समजते.
आपल्या जन्मदिनी राहुल पक्षाच्या मुख्यलयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सर्वांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर युपीए आणि संसदीय समितीच्या बैठकीत देखील त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राहुल पुन्हा पक्षाच्या कामावर परतल्याचे नेत्यांकडून समजते. मात्र सिद्धू यांच्यासह इतर राज्यातील नेत्यांना राहुल यांनी भेट नाकारल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी देखील राहुल यांनी गेहलोत यांची भेट घेतली नव्हती.
याआधी १० जून रोजी सिद्धू यांनी प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत राहुल यांची भेट घेतली होती. तसेच आपली बाजू मांडली होती. त्यावेळी पंजाबमध्ये सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील दुरावा कमी करण्याच्या सूचना अहमद पटेल यांना करण्यात आल्या होत्या. त्यातच सिद्धू यांच्याकडे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र हा प्रस्ताव सिद्धू यांना नाकारला होता. त्यामुळे राहुल यांना भेटून सिद्धू आपली भूमिका स्पष्ट करणार होते. परंतु, राहुल यांची भेट झाली नसल्यामुळे सिद्धू यांना रिकाम्या हाती परतावे लागले.