नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मौनामुळे 'सस्पेन्स'; 'आप'मध्ये जाण्याची शक्यता !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 09:31 AM2020-02-20T09:31:27+5:302020-02-20T09:33:12+5:30
सिद्धू सध्या माध्यमांशी बोलत नसून मतदार संघातील कार्यक्रमांमध्ये देखील फारसे दिसत नाही. त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत सामील केले होते. मात्र सिद्धू दिल्लीतील निवडणुकीपासून अलिप्त होते.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या भूमिकेवरून पंजाबच्या राजकारणात पुन्हा एखदा सस्पेन्स निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या पक्षांनी सिद्धूच्या प्रवेशावरून दावे केले आहेत. तर काँग्रेसने देखील मान्य केले की, पक्षात सर्वकाही ठिक नाही. मात्र सिद्धू यांची समजूत काढू असा विश्वासही काँग्रेस नेत्यांना आहे.
सिद्धू आगामी काळात काय भूमिका घेणार असा प्रश्न पंजाबमध्ये अनेकांना पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धू यांनी मौन बाळगले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेटमंत्री सिद्धू यांचे खाते बदलले होते. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला होता. तेव्हापासून सिद्धू यांनी मौन बाळगले आहे. आता सिद्धू 'आप'मध्ये जाण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे.
सिद्धू सध्या माध्यमांशी बोलत नसून मतदार संघातील कार्यक्रमांमध्ये देखील फारसे दिसत नाही. त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत सामील केले होते. मात्र सिद्धू दिल्लीतील निवडणुकीपासून अलिप्त होते.
दरम्यान सिद्धू काय भूमिका घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश करणार की, भाजपमध्ये घरवापसी करणार असे अनेक प्रश्न पंजाब राजकारणात उपस्थित होत आहे. या व्यतिरिक्त अकाली दल टकसाली या संघटनेत सिद्धू सामील होण्याची शक्यताही अनेकजण बोलून दाखवत आहेत. मात्र ते काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.