एनडीए विरुद्ध इंडिया; पुन्हा मोठी लढाई, तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 08:35 AM2024-07-16T08:35:19+5:302024-07-16T08:36:12+5:30
उत्तर प्रदेशातील १०, प. बंगालमधील ६ आणि बिहारमधील ४ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. जरी हे निकाल संख्यात्मकदृष्ट्या महत्त्वाचे नसले तरी एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांच्या मनोबलावर याचा परिणाम नक्कीच होणार आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या सात राज्यांतील १३ विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एनडीएचा १० जागांवर पराभव झाला. त्यानंतर आता एनडीए आणि इंडिया आघाडीत उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत पुन्हा लढत होणार आहे.
उत्तर प्रदेशातील १०, प. बंगालमधील ६ आणि बिहारमधील ४ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. जरी हे निकाल संख्यात्मकदृष्ट्या महत्त्वाचे नसले तरी एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांच्या मनोबलावर याचा परिणाम नक्कीच होणार आहे.
१० जुलै रोजी विधानसभेच्या १३ जागांवर पोटनिवडणूक झाली. मात्र, निवडणूक आयोगाने या २० जागांवर पोटनिवडणूक घेतली नाही. ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांसोबत या २० जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते.
उत्तर प्रदेशात मोठे परिणाम घडणार?
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीचे व्यापक परिणाम होऊ शकतात, कारण ‘इंडिया’ने लोकसभेच्या ८० जागांपैकी ४३ (३७ सपा आणि ६ काँग्रेस) जागा जिंकल्या आहेत.
तर एनडीएने ३६ (३३ भाजप, २ आरएलडी, एक अपना दल) जागा जिंकल्या आहेत. बिहारमधील रामगढ, बेला, इमामगंज आणि तराई या लोकसभेच्या जागा विद्यमान आमदारांनी जिंकल्याने रिक्त झाल्या आहेत.