NEET वरून लोकसभेत खडाजंगी, राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित करताच अध्यक्ष म्हणाले, पूर्ण वेळ घ्या, सविस्तर बोला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 01:04 PM2024-06-28T13:04:49+5:302024-06-28T13:05:35+5:30
NEET Exam News: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नीटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर नीटचा प्रश्न उपस्थित केला.
सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नीटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर नीटचा प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी यांनी सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नीटच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान, तुम्ही प्रत्येक विषयावर बोलू शकता, असे सांगितले. राहुल गांधी यांनी यावेळी अध्यक्षांकडे दोन मिनिटांचा वेळ मागितला होता, तेव्हा लोकसभा अध्यक्षांनी दोन मिनिटे कशाला, तुमच्या पक्षाचा जेवढा वेळ आहे तेवढा वेळ घ्या, सविस्तर बोला. मात्र तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. त्यामुळे संसदीय मर्यादांचं पालन करा, असे राहुल गांधी यांना सांगितले.
आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील १३ माजी सदस्यांच्या निधनाची माहिती सभागृहाला देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सदस्यांना त्यांच्यासमोर असलेली कागदपत्रे पटलावर ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी राहुल गांधी यांनी नीटचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. राहुल गांधींच्या मागणीला उत्तर देताना लोकसभेच्या अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर सविस्तर बोलू शकता. तसेच सरकार त्याला उत्तर देईल, अशी मला अपेक्षा आहे, असे सांगितले.
यादरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दोन मिनिटांचा वेळ मागिलता. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, दोन मिनिटे कशाला, तुमच्या पक्षाचा जेवढा वेळ आहे, तेवढा वेळ घेऊ शकता. तुम्ही सविस्तर बोला. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. संसदीय मर्यादांचं पालन करा. त्यावर राहुल गांधी काही बोलल्याने लोकसभा अध्यक्षांनी त्यांना पुन्हा एकदा माहिती देताना मी माईक बंद करत नाही. इथे कुठलंही बटन नाही आहे, असे सांगितले.
नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आम्हाला देशातील जे विद्यार्थी आहेत. त्यांना संयुक्त संदेश द्यायचा होता. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याचा विचचार केला होता, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला, तसेच घोषणाबाजी केली. या गोंधळादरम्यान, ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले.