New Congress President: राहुल गांधींच्या नकारानंतर 'या' नेत्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा? सोनिया गांधींनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:33 PM2022-08-24T14:33:14+5:302022-08-24T14:34:29+5:30
Congress Chief Election: 2019 लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
New Congress Chief: काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार, यावर सध्या विचार मंथन सुरू आहे. 21 सप्टेंबर रोजी काँग्रेस आपल्या नव्या अध्यक्षाची घोषणा करणार आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे. या बैठकीत सोनियांनी गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास सांगितले असल्याचे मानले जात आहे. 20 सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक होणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी म्हणत आहेत की, आता बिगर गांधी कुटुंबातील व्यक्तीने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत. दुसरीकडे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी यादेखील अध्यक्ष पदावर राहू इच्छित नाहीत.
अशोक गेहलोत यांना सोनिया गांधी यांची भेट आणि काँग्रेस अध्यक्षपदाच्या ऑफरबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "मी वारंवार राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे असे म्हणत आहे. राहुल अध्यक्ष झाल्यावर पक्ष नव्याने उभारी घेईल. त्यांच्याशिवाय पक्षाचे अस्तित्व टिकणार नाही. त्यांच्याशिवाय पक्ष टिकणार नाही, कार्यकर्त्यांच्या भावना समजून राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे.''