कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं; भाजपच्या या नेत्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:17 PM2024-02-17T17:17:56+5:302024-02-17T17:20:43+5:30

कमलनाथ हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

News of Kamalnath joining BJP is fake says bjp leader Tajinder Bagga | कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं; भाजपच्या या नेत्यानेच केला खुलासा

कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं; भाजपच्या या नेत्यानेच केला खुलासा

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे पुत्र नकुलनाथ यांच्यासोबत अचानक दिल्लीत दाखल झाले असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. "माझ्या भाजप प्रवेशाबद्दल तुम्हीच जास्त उत्साहित आहात. असं काही असेल तर मी सगळ्यात आधी तुम्हालाच सांगेन," असं म्हणत कमलनाथ यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळलं नाही. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावली असली तरी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर बग्गा यांनी मात्र कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.

तजिंदर बग्गा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं आहे." कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर तजिंदर बग्गा यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात होतं. कारण काँग्रेसने २०१८ साली कमलनाथ यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनवल्यानंतर याच बग्गा यांनी त्यांच्याविरोधात उपोषण केलं होतं. "शीखांच्या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण करणार," अशी भूमिका तेव्हा बग्गा यांनी घेतली होती. मात्र हेच कमलनाथ आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी तजिंदर बग्गा यांची अडचण झाली आहे.

दरम्यान, तजिंदर बग्गा यांच्या म्हणण्याप्रमाणे कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्त खोटं ठरतं की ते कमळ हाती घेणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

मध्य प्रदेशमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

मध्य प्रदेशमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. "भारताच्या माजी पंतप्रधान दिवगंत इंदिरा गांधी या कमलनाथ यांना आपला तिसरा पुत्र समजत असत. कमलनाथ मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. असे कमलनाथ हे काँग्रेस सोडून जाण्याचा स्वप्नातही विचार करणार नाहीत," असं पटवारी यांनी म्हटलं आहे.

Web Title: News of Kamalnath joining BJP is fake says bjp leader Tajinder Bagga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.