पुढील 24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा, सावध राहा! राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:49 PM2019-05-22T14:49:31+5:302019-05-22T14:50:02+5:30
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी राहिला असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी राहिला असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. सावध राहा, असे आवाहन राहुल गांधींनी केले आहे.
एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज आणि ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ''पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत.सतर्क आणि सावध राहा, घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या दुष्प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा, मेहनत वाया जाणार नाही,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं ,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019
अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी।
जय हिन्द।
राहुल गांधी
यापूर्वी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही एक ऑडिओ संदेश पाठवून कार्यकर्त्यांना एक्झिट पोलचे अंदाज गांभीर्याने न घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, च ईव्हीएमच्या सुरक्षाव्यवस्था विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांनी आपले कार्यकर्ते तैनात केले आहे. एवढच नाही तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेरून दुर्बिणीतून लक्ष ठेवण्यात येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी सीसीटीव्ही बसवले आहे. तर, दिवस रात्र स्ट्रॉंग रूमची चौकीदारी करताना उमेदवार दिसत आहे.
तर गुरुवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतांशी जुळणी करण्याची विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसारच मतमोजणी होणार आहे.