कितीही जोरात ओरडा नोकरी मिळणार नाही; राहुल गांधींची भरती घोटाळ्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:55 AM2024-02-22T06:55:20+5:302024-02-22T06:55:47+5:30
उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
उन्नाव :राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पोहोचली असून, त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली.
उद्योगपतींनी सरकारला घेरले असून, भरती सुरू केल्यानंतर ते पेपर फोडतात. तुम्हाला त्रास दिला जात आहे. कितीही जोरात ओरडा, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. सरकारला मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांना पदोन्नती नको आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील ६९,००० शिक्षकांच्या भरतीतील घोटाळा हा सरकारच्या आरक्षणविरोधी मानसिकतेचा पुरावा आहे. सरकारने मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेतले आहेत. पीडित विद्यार्थ्यांनी मला भेटून सांगितले की, या भरतीमध्ये ओबीसी वर्गाला २७% ऐवजी फक्त ३.८६% आरक्षण मिळाले आहे आणि अनुसूचित समाजाला २१% ऐवजी फक्त १६.६% आरक्षण मिळाले आहे.
आरक्षण प्रक्रियेत छेडछाड ही गंभीर बाब आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.
केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार
nराहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनच्या प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देतील आणि त्यानंतर पक्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या बैठकांमध्येही सहभागी होतील.
n त्यामुळे न्याय यात्रा काही दिवस स्थगित राहील. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.