No Confidence motion : भाजपाचं पारडं जड?...मोदी, सुषमा, स्मृती इराणी विरोधकांना पडले होते भारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 12:10 PM2018-07-20T12:10:23+5:302018-07-20T13:01:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे.
नवी दिल्ली- लोकसभेत तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर आता चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांना सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सततच्या गोंधळामुळे कोणत्याही प्रकारचे कामकाज संसदेत झाले नव्हते. मात्र पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यावर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारला आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले. मात्र ही मोदी सरकारची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. कारण अविश्वासदर्शक ठरावावर फक्त एक दिवस चर्चा होणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळ या चर्चेसाठी उपलब्ध झाला आहे. काँग्रेस पक्षाला या सर्व चर्चेत 38 मिनिटे मिळाली आहेत तर सरकार पक्षाला साडेतीन तास मिळाले आहेत. या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीने सुषमा स्वराज यांच्यासारख्या प्रभावी वक्तृत्त्व असणाऱ्या ज्येष्ठ मंत्र्यांना बोलण्याची संधी दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सर्वात शेवटी चर्चेला उत्तर देतील.
या लोकसभेचा आजवरचा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळेस सरकार ज्या ज्या वेळेस अडचणीत आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्यासारख्या उत्तम वक्त्यांनी आपल्या भाषणाच्या जोरावर बाजी मारून नेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये ज्या विषयांवर टीका होते त्या सर्व विषयांवर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांची अशीच मते होती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वेगळ्या शैलीतून सांगून विरोधकांना गप्प केले होते. ललित मोदीला भारताबाहेर पळून जाण्यास सुषमा स्वराज यांनी मदत केली असा आरोप झाल्यावर सुषमा स्वराज यांनी अत्यंत जोरदार भाषण करत सर्व बाजू विरोधकांवरच उलटवली होती. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी भोपाळ दुर्घटनेसारख्या दुर्देवी घटनेतील अँडरसनसारख्या आरोपींना पळून जाण्यास मदत केली हे काँग्रेसचेच मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या पुस्तकाचा दाखला देत स्पष्ट केले होते. सुषमा स्वराज यांच्या या भाषणानंतर लोकसभेचे स्वरुपच पालटून गेले होते. विरोधकांनी दिलेल्या घोषणांमध्येही त्यांनी भाषण सुरु ठेवलं होतं. अशीच काहीशी स्थिती स्मृती इराणी यांच्या भाषणावेळेस झाली होती. रोहित वेमुला याच्या आत्महत्येसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत त्यांनी आपल्या खात्याची (तेव्हा मनुष्यबळ विकासमंत्री) बाजू मांडली होती. या अत्यंत भावनिक भाषणाच्या वेळेस स्मृती इराणी यांनी आपल्या खात्याची बाजू मांडलीच त्याहून आपण रोहितच्या आत्महत्येनंतर सर्व आवश्यक ती कर्तव्ये कशी पार पाडली हे भाषणातून सांगितले होते. त्यांच्या भाषणानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलताना, आता काही सांगण्याची गरज राहिलेली नाही. मी स्मृती इराणी यांचं कौतुक करतो, हे भाषण संसदेच्या इतिहासातील उत्तम भाषणांपैकी एक आहे असे सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांच्या भाषणांचे व्हीडिओ नंतरही यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपवर गाजत राहिले. नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांनी कोंडी केल्यावर आपल्या वक्तृत्त्वाद्वारे त्यांच्यावर मात करण्याचा गेली चार वर्षे प्रयत्न केला आहे. आजही तसेच होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी स्वतःच 2019 सालच्या निवडणुकीच्या पंतप्रधान मोदी यांना भावनिक भाषण करण्याची संधी दिली आहे.