लोकसभाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी, ओम बिर्ला परत आलेच नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:25 PM2023-03-28T18:25:20+5:302023-03-28T18:26:26+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवण्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवण्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे. काँग्रेसने गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. संसदेतही या प्रकरणी गदारोळ सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या या निर्णयाला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हणत विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. यावर आता काँग्रेस पक् आक्रमक झाला आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा अध्यक्षांविरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. विरोधी पक्ष सोमवारी ३ एप्रिल रोजी लोकसभेत लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडू शकतात. अविश्वास ठराव आणण्यासाठी ५० सदस्यांचा पाठिंबा असायला लागतो. सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ आहे, पण यासाठी सभागृहाचे कामकाज चालणे आवश्यक आहे.
सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना संसदेत बोलण्याची संधी न दिल्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप विरोधक करत आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर २४ तासांच्या आत राहुल गांधी यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले यावरुन विरोधी पक्षही लोकसभा अध्यक्षांवर हल्लाबोल करत आहेत. संसदेतही सभापती ओम बिर्ला यांच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेचे कामकाज सुरू होऊन एक दिवस आधी सभापतींच्या दिशेने कागद फेकण्यात आले आणि सभापती ओम बिर्ला आसनावर पोहोचले, तेव्हा काळ्या कपड्यात संसदेत पोहोचलेले विरोधी खासदार 'तुम्ही लोकशाहीची हत्या करत आहात' म्हणत वेलमध्ये आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभापती ओम बिर्ला यांच्या दिशेनेही कागद फेकले. सभापती ओम बिर्ला यांना सन्मानाने सभागृह चालवायचे आहे, असे सांगून सभागृह तहकूब केला.
आज अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात आलेले नाहीत. विरोधी खासदारांच्या या वर्तनानंतर लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले, त्यानंतरही सभापती ओम बिर्ला सभागृहात आले नाहीत. मंगळवारीही सभापती ओम बिर्ला सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी आले नाहीत. पीव्हीएम रेड्डी हे स्पीकर ओम बिर्ला यांच्या जागेवर बसले होते. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही पीव्हीएम रेड्डी यांच्या दिशेने कागद फेकून निषेध व्यक्त केला. सोमवार आणि मंगळवारी विरोधी पक्षांचे खासदार फलक घेऊन लोकसभेत पोहोचले. या फलकांवर लोकशाही वाचवा, डेमोक्रसी इन डेंजर अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.