राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:38 PM2022-07-05T14:38:05+5:302022-07-05T14:49:45+5:30

राहुल गांधी वायनाडमधील घटनेबाबत बोलले होते, पण त्याचा संदर्भ उदयपूर हत्येशी जोडून दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी चॅनेलने माफीदेखील मागितली.

Noida police takes news anchor Rohit Ranjan into custody amid misleading video of Rahul Gandhi | राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात

राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात

Next

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधील व्हिडिओ उदयपूरच्या घटनेशी जोडल्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. याप्रकरणी हिंदी वृत्त वाहिनी झी टीव्हीचा न्यूज अँकर रोहित रंजन यांना मंगळवारी नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चॅनलने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडिओबद्दल चॅनलने माफीही मागितली होती.

सीएम योगींना टॅग केले
दरम्यान, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये जोरदार वादावादी आणि धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. छत्तीसगड पोलिस टीव्ही अँकरला अटक करण्याचा प्रयत्न करत होते, तर गाझियाबादध्ये पोलीस त्या अँकरला दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस घरात दाखल झाल्यानंतर अंकरने सीएम योगी आदित्यनाथ, एसएसपी गाझियाबाद आणि एडीजी लखनऊ यांना टॅग करत ट्विट केले होते की, 'छत्तीसगड पोलिस स्थानिक पोलिसांना न कळवता मला अटक करण्यासाठी माझ्या घरी दाखल झाले आहेत, हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?'

पोलिसांनी अटक वॉरंटही दाखवले
त्यावर छत्तीसगड पोलिसांनी उत्तर दिले की, जर वॉरंट असेल तर कोणालाही माहिती देण्याची गरज नाही. रायपूर पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'माहितीचा असा कोणताही नियम नाही. मात्र, आता युपी पोलिसांना माहिती मिळाली आहे. पोलीस पथकाने तुम्हाला न्यायालयाचे अटक वॉरंटही दाखवले. तुम्ही त्यांना सहकार्य करावे, तपासात सहभागी व्हावे आणि न्यायालयात आपली बाजू मांडावी.' दरम्यान, या सर्व गोंधळात अँकरला अटकेपासून वाचवण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी त्यांना सोबत घेतले. सध्या ते यूपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर सामान्य कलमे लावण्यात आली आहेत.

नेमकं काय प्रकरण आहे?
केरळमधील वायनाड येथे राहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तरुणांना उद्देशून राहुल गांधी बोलले होते. ते म्हणाले होते की, 'त्या मुलांना माफ करा.' पण, त्या वक्तव्याचा संबंध उदयपूरच्या हत्येतील आरोपींशी जोडण्यात आला. अँकर रोहित रंजन यांनी तो दिशाभूल करणारा व्हिडिओ चॅनलवर चालवला. यानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अँकरवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ राज्यवर्धन राठौर सारख्या भाजप नेत्यांनीही शेअर केला होता, त्यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

चॅनलने माफी मागितली
या गोंधळानंतर चॅनलने माफीदेखील मागितली होती. रंजन आपल्या शोमध्ये म्हणाले, 'काल आमच्या शोमध्ये उदयपूरच्या घटनेला जोडून राहुल गांधींचे विधान चुकीच्या संदर्भात दाखवण्यात आले होते, ही एक मानवी चूक होती ज्यासाठी आमची टीम माफी मागते.' चॅनेलने माफी मागितली, पण सध्या पोलीस टीव्ही अँकरला अटक करण्यासाठी आले आहेत. यावरुन दोन राज्यांची पोलीस आमने-सामने आले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: Noida police takes news anchor Rohit Ranjan into custody amid misleading video of Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.