बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व अमान्य; सोनिया गांधींनी बोलावली गुरुवारी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:04 AM2021-06-22T06:04:32+5:302021-06-22T06:05:04+5:30
- शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे चिंतित झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया ...
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे चिंतित झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची येत्या गुरुवारी बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी, विधानसभांतील काँग्रेस गटनेते, प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्या आगामी रणनीतीबाबत चर्चा करण्यात येईल.
या बैठकीबद्दलची माहिती संबंधित नेत्यांना काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी कळविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्या, मंगळवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत काँग्रेसला फारसे महत्त्व मिळणार नाही, याचे संकेत सोनिया गांधी यांना मिळाले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए स्थापन झाली. मात्र, बिगरभाजप पक्षांची तिसरी आघाडी स्थापन झाली तर तिचे नेतृत्व काँग्रेसकडे येणार नाही, हे स्पष्ट आहे.
प्रादेशिक पक्षांशी आघाडी करावी का?
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब आदी राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका यांच्याबाबत काय रणनीती असावी, याविषयी काँग्रेस नेते गुरुवारच्या बैठकीत चर्चा करतील. बिगरभाजप पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसने राज्यस्तरावर प्रादेशिक पक्षांशी युती करावी का यावरही या बैठकीत खल होईल, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अन्य महत्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा हाेणार आहे. बिगरभाजप पक्षांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसणे हा काँग्रेससाठी सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळेच काँग्रेसला संभाव्य तिसऱ्या आघाडीपासून लांब ठेवण्याचे काही पक्षांचे प्रयत्न आहेत.