'स्वातंत्र्याच्या लढ्यात तुमच्या गटातील कुत्र्यानंही जीव दिला नाही', भाजपवर निशाणा साधत खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 08:00 PM2022-12-19T20:00:48+5:302022-12-19T20:02:54+5:30
खर्गे म्हणाले, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला जीव दिला. आपण काय केले? आपल्या घरातील कुणी देशासाठी मेले आहे का? कुणी आपले बलिदान दिले आहे?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपले प्राण दिले. पण, भाजपवाल्यांच्या घरातून स्वातंत्र्याच्या लढ्यात एक कुत्राही मेला नाही, असे वक्तव्य खर्गे यांनी केले आहे.
आपल्या निवेदनात खर्गे म्हणाले, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला जीव दिला. आपण काय केले? आपल्या घरातील कुणी देशासाठी मेले आहे का? कुणी आपले बलिदान दिले आहे? एवढेच बोलून मल्लिकार्जुन खर्गे थांबले नाही. तर त्यांनी राहूल गांधींच्या वक्तव्याचा बचावही केला आणि सरकारवर अनेक प्रश्नही उपस्थित केले.
खर्गेंनी उंदरासोबत कुणाची तुलना केली? -
खर्गे म्हणाले, सीमेवर आपल्या 20 जवानांना हौतात्म्य आले अन् मोदीजी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची 18 वेळा भेट झाली. आपण भेटत आहात, पण आम्ही चर्चेची मागणी करतो, तर तुम्ही चर्चा करायला तयार नाही. राजनाथ सिंहांनी 1 पानाचे निवेदन दिले आणि ते देऊन ते निघून गेले. आम्ही म्हणत आहोत की चर्चा करा, आम्हालाही सांगा, देशालाही सांगा की नेमके काय सुरू आहे? सरकार काय करत आहे? एवढेच नाही तर, बाहेर सिंहाप्रमाणे बोलतात, पण चालणे उंदरासारखे आहे, असा टोमणाही यावेळी खरगे यांनी मारला.