महाआघाडीवरून शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:59 AM2019-01-15T06:59:22+5:302019-01-15T07:01:12+5:30
राहुल गांधी यांनी पवारांची चारवेळा भेट घेतली.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर २२ विरोधी पक्षांची महाआघाडी नसेल, हे आता स्पष्ट होत चालले आहे. विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांच्या राज्यांत ना संयुक्त सभा होतील ना ते एकत्रितपणे प्रचार करतील हेही स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या संयुक्त सभा टाळणे हे योग्य ठरेल, असे सुचवले आहे. विरोधी पक्षांनी राज्यांत व मतदारसंघांत आपापल्या उमेदवारांचा विजय निश्चित होण्यावर लक्ष केंद्रित करावे. संयुक्त सभा राज्य पातळीवर गरज असेल तरच घेतल्या जाव्यात, असे पवार म्हणाले.
राहुल गांधी यांनी पवारांची चारवेळा भेट घेतली. नुकत्याच एका भेटीत पवारांना महाआघाडीऐवजी फक्त राज्यांतच आघाड्या कराव्यात, असे जाणवले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने युती करण्याचे तत्वत: ठरवले आहे. तसेच इतर राज्यांतही आघाड्या करण्याची हीच वेळ आहे. काँग्रेसने तमिळनाडू, बिहार, झारखंड, आंध्र, काश्मीरमध्ये तत्वत: आघाडी केली आहे. परंतु, उत्तर प्रदेशात सपा-बसपाशी आघाडी झालेली नाही.
काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढावे की ममता बॅनर्जी यांच्यासोबत जावे की माकपसोबत हा तिढा सोडवायचा आहे. गुजरात तसेच कर्नाटकातील प्रश्नही त्याच्यासमोर आहे. कर्नाटकात तर काँग्रेसने जनता दलासोबत (धर्मनिरपेक्ष) सरकारही स्थापन केले आहे. याशिवाय हा पक्ष दिल्ली, पंजाब आदी राज्यांत आम आदमी पक्षासोबत आघाडी, जागावाटप आदी प्रश्नांना तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रव्यापी संयुक्त सभा नकोत व अशा संयुक्त प्रचार फक्त राज्यांतच मर्यादित ठेवाव्यात, असे सुचवले आहे. शरद पवार यावर भाष्य करण्यास लगेच उपलब्ध झाले नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही लाभ घेण्याची वेळ असून त्या दिशेने चर्चा झालेली आहे, असे सांगितले. मात्र तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
पवारांनी काय दिला सल्ला?
ही लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध इतर सगळे’ अशी बनवणे भाजपाला आवडेल तसेच विरोधकांपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत अशी स्वत:ची प्रतिमा भाजपा रंगवेल हे शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले आहे. मोदी यांना पदावरून दूर करण्यासाठी नुकतेच २२ विरोधी पक्ष नेते एकत्र आले होते. पण तो प्रयोग सध्या टाळावा. दोन पोटनिवडणुका आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचा दुबळेपणाच सिद्ध झाला आहे, असे पवार यांचे मत आहे.