राहुल गांधीच नाही तर सोनिया आणि इंदिरा गांधींनाही गमवावी लागली होती खासदारकी, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:07 PM2023-03-24T21:07:04+5:302023-03-24T21:07:38+5:30
Rahul Gandhi : लोकसभेचं सदस्यत्व गमावणारे राहुल गांधी हे गांधी कुटुंबातील पहिलेच सदस्य नाही आहेत. याआधी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांनाही सदस्यत्व गमवावं लागलं होतं.
केरळमधील वायनाड येथून लोकसभेवर निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व आज रद्द करण्यात आलं. या प्रकारामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना त्वरित जामीन देण्यात आला. मात्र या शिक्षेमुळे त्यांचं लोकसभेतील सभासदत्व संकटात सापडलं. दरम्यान, लोकसभेचं सदस्यत्व गमावणारे राहुल गांधी हे गांधी कुटुंबातील पहिलेच सदस्य नाही आहेत. याआधी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांनाही सदस्यत्व गमवावं लागलं होतं.
आज राहुल गांधी यांच सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांच्याबाजूने फार मोठ्या प्रमाणावर वातावरणनिर्मिती झालेली नाही. मात्र इंदिरा गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर ही कारवाई त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी संजीवनी ठरली होती. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर १९७८ मध्ये चिकमंगळूर येथील पोटनिवडणुकीत विजयी होऊन त्या लोकसभेत पोहोचल्या होत्या. मात्र त्यानंतर तत्कालीन मोरारजी देसाई सरकारने त्यांच्याविरोधात कार्यकाळादरम्यान सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करून पदाचा अपमान केल्या प्रकरणी प्रस्ताव मांडला. सात दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव पारित करण्यात आला. तसेच इंदिरा गांधी यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते. मात्र त्यानंतर १९८० मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी प्रचंड बहुमतासह विजय मिळवून लोकसभा गाठली होती.
तर २००६ मध्ये संसदेतील लाभाच्या पदाच्या प्रकरणात सोनिया गांधींवर गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार सत्तेत होते. तेव्हा सोनिया गांधी ह्या रायबरेली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. तसेच तेव्हा सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या त्या चेअरमन होत्या. हे लाभाचे पद मानले गेले होते. त्यामुळे सोनिया गांधी यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी रायबरेली येथून पुन्हा निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत सदस्य म्हणून आल्या.