आता विरोधकही म्हणतात, एनडीए ४०० जागा जिंकणार; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:18 AM2024-02-12T09:18:35+5:302024-02-12T09:19:07+5:30
लूट आणि फूट हा काँग्रेस पक्षासाठी ऑक्सिजन : पंतप्रधान मोदी
झाबुआ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांचा आकडा पार करेल असा विश्वास आहे आणि संसदेतील विरोधी पक्षांचे नेतेही सत्ताधारी आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर, लूट आणि फूट हा काँग्रेस पक्षासाठी ऑक्सिजन आहे, अशा शब्दात त्यांनी रविवारी येथे काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आदिवासी समुदायाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी आदिवासींची पारंपरिक वस्त्रे परिधान केली होती. ते म्हणाले की, लूट आणि फूट हे काँग्रेसचे ब्रीदवाक्य आहे. काँग्रेस सत्तेत असताना लूटमार करते, सत्तेबाहेर असताना समाजात भाषा, प्रदेश आणि जातीच्या आधारे विभागणी करते. लूट आणि फूट काँग्रेससाठी ऑक्सिजन आहे. मोदी म्हणाले की, आपण आदिवासी आणि गरिबांच्या भल्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी नेते आपणावर टीका करतात.
पंतप्रधान मुलाला म्हणाले, मला तुझे प्रेम मिळाले...
नरेंद्र मोदी रविवारी मध्य प्रदेशातील झाबुआ येथे आदिवासी समुदायाच्या सभेसाठी दाखल झालेले असताना एक लहान मुलगा त्यांच्याकडे पाहून हात हलवून आपले प्रेम व्यक्त करत होता. ते पाहून मोदी त्या मुलाला म्हणाले की, मला तुझे प्रेम मिळाले बेटा. आता हात खाली कर. नाही तर तो दुखेल. हा मुलगा गर्दीमध्ये आनंदाने ओरडत होता. येथे त्यांनी ७५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.
‘भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्थेची गरज’
टंकारा (गुजरात) : भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थानी टंकारा येथील कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
लाेकांकडून मिळाले प्रचंड प्रेम : नरेंद्र माेदी
काँग्रेस आदिवासीविरोधी आहे आणि फक्त निवडणुकीच्या वेळी गावे, शेतकरी आणि गरिबांचा विचार करते, अशी टीका माेदींनी केली.
देशाच्या दक्षिणेतील प्रभू रामाशी संबंधित मंदिरांना भेटी दिल्याने लोकांकडून त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. पराभवाची जाणीव असल्याने काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी शेवटचे डावपेच अवलंबत आहेत, असे माेदी म्हणाले.