"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 20:18 IST2025-04-16T20:18:07+5:302025-04-16T20:18:37+5:30

गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना सुनावत तरुणांना काम करण्याची संधी द्यावी असे म्हटलं.

Only Congress can defeat RSS and BJP Rahul Gandhi says in Gujarat | "पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं

"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं

Rahul Gandhi Gujarat Congress: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातकाँग्रेसमध्ये मोठ्या बदलांबद्दल भाष्य केले आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसला काही सूचना दिल्या आहेत. आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी फक्त काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला हरवू शकतो असा दावा केला. पक्षात स्थानिक नेत्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. तसेच, निर्णय घेण्याचा अधिकार देखील स्थानिक पातळीवर असावा, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं. यावेळी राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेत्यांवरही निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी यापूर्वीही गुजरातमधील काँग्रेसच्या कमकुवत स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी अरावली जिल्ह्यातील मोडासा शहरात बूथ स्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निराश दिसत असले तरी, फक्त आपलाच पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  आणि भाजपला पराभूत करू शकतो, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी राज्यातील संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी एक रोडमॅप सादर केला आणि निष्क्रिय असलेल्या किंवा भाजपसाठी काम करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना काढून टाकण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राहुल गांधींनी त्यांच्याच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. "जे वरिष्ठ नेते म्हणून फिरत आहेत त्यांना साधे बूथ जिंकता येत नाहीत. ज्या लोकांचे बूथवर प्रभुत्व आहे आणि जे स्थानिक आहेत, त्यांना आम्हाला निर्णय घेऊ द्यायचा आहे. आम्हाला सार्वजनिक मुद्दे मांडणाऱ्यांना सक्षम बनवायचे आहे आणि प्रोत्साहन द्यायचे आहे. भाजपशी संबंधित असे अनेक लोक आहेत, आपण त्यांना ओळखून दूर ठेवले पाहिजे. हिंसाचाराने नाही, द्वेषाने नाही, तर प्रेमाने. आपण त्यांना सांगायला हवे कृपया बाजूला व्हा, इतरांना पुढे जाऊ द्या," असं राहुल गांधी म्हणाले.

"तुम्ही गुजरातमध्ये काँग्रेससाठी लढता आहात, मला माहिती आहे की हे सोपे नाही. कदाचित तुम्हाला संपूर्ण देशात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असेल. तुम्हाला धमक्या आणि हल्ला सहन करावा लागतो पण काँग्रेसचा झेंडा सोडू नका. मी तुम्हाला सांगतो की जिथे माझी गरज असेल तिथे मी तिथे उभा राहीन. आपल्याला नवीन पिढीला काँग्रेस पक्षात आणावे लागेल. जे जनतेशी जोडलेले आहेत त्यांना पुढे घेऊन जावे लागेल," असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, गुजरातमधील संघटनेची पुनर्बांधणी करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा युनिट्सना बळकट करण्यासाठी एक पायलट योजना राहुल गांधींनी सुरु केली. २०२७ च्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
 

Web Title: Only Congress can defeat RSS and BJP Rahul Gandhi says in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.